राजस्थानच्या या देवीची औरंगजेब याने मागितली होती माफी, चमत्कारिक आहे हे मंदिर!
या मंदिरात औरंगजेबाला नतमस्तक व्हावे लागले होते असे इतीहासकार सांगतात. मंदिराच्या चमत्काराने तो इतके प्रभावित झाला की त्यांनी मंदिरात अखंड ज्योती सुरू केली.
मुंबई : औरंगजेब (Aurangzeb) हिंदू मंदिरे नष्ट करण्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्याने देशभरातील हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली होती, पण राजस्थानमध्ये असेच एक मंदिर आहे, ज्यासमोर त्याला नतमस्तक व्हावे लागले. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेले जीनमाता मंदिर (Jeenmata Temple) खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात औरंगजेबाला नतमस्तक व्हावे लागले होते असे इतीहासकार सांगतात. मंदिराच्या चमत्काराने तो इतके प्रभावित झाला की त्यांनी मंदिरात अखंड ज्योती सुरू केली आणि दिल्ली दरबारातून तेल पाठवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत जीनमाता मंदिरात तीच ज्योत अखंड तेवत आहे.
मंदिर पाडायला आलेल्या सैन्यांवर मधमाशांनी केला हल्ला
जीनमाता मंदिराच्या इतिहासात मुघल सम्राट औरंगजेबाच्या स्वारीचा आणि येथील चमत्कारांचा प्रभाव असल्याचा उल्लेख आढळतो. इतिहासकार महावीर पुरोहित यांच्या मते, उत्तर भारतातील मंदिरांवर हल्ला करत असताना औरंगजेबाचे सैन्य सीकरला पोहोचले तेव्हा त्याला जीनमातेच्या मंदिरावरही हल्ला करायचा होता. त्यानंतर देवीने मुघल सैन्यावर असंख्य मधमाशा सोडल्या, त्यामुळे मुघल सैन्य घाबरले आणि पळू लागले. ही गोष्ट औरंगजेबाला कळल्यावर तो मातेच्या चमत्काराने प्रभावित झाला आणि जीन मातेची माफी मागुन त्याने मंदिरात अखंड दिवा लावण्याचा संकल्प केला. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारातून तेल पाठवण्याची परंपरा सुरू केली. हा अखंड दिवा आजही मंदिरात तेवत आहे.
खाटू श्यामजीपासून 26 किमी अंतरावर आहे जीनमाता मंदिर
खाटू श्यामजी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून 26 किलोमीटर अंतरावर जीनमातेचे मंदिर आहे. जयपूरपासून 115 किमी अंतरावर आणि सीकरपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात चैत्र आणि शारदीय नवरात्रांमध्ये एक जत्रा आयोजित केली जाते, ज्यामध्ये देशभरातून भक्त जीन भवानीच्या दर्शनासाठी येतात. खाटू श्यामजींच्या फाल्गुनी आणि मासिक जत्रेला लाखो भाविक जीनमातेच्या दर्शनासाठी येतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)