ज्येष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड, असा आहे त्यांचा जीवन प्रवास
Baba Maharaj Satarkar बाबामहाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रीकपर्यंत शिक्षण घतले होते. बाबामहाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. बाबामहारांचे किर्तन ऐकण्यासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक गर्दी करायचे.
मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. नवी मुंबईच्या नेरूळ येथे त्यांची प्रणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर आज नेरूळ येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरूळ येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार आहे. आध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबामहाराज सातारकर यांचे खरं नाव, निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरीचे विविध पैलू सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
असा आहे त्यांचा जीवन परिचय
बाबामहाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. इंग्रजांच्या काळात त्यांनी इंग्रजीत मॅट्रीकपर्यंत शिक्षण घतले होते. बाबामहाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. बाबामहारांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक गर्दी करायचे. बाबामहाराजांच्या घरात गेल्या तीन पिढ्यापासून किर्तनाचा वारसा जोपासला जातोय. बाबामहाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांची आई लक्ष्मीबाई यांना संत वाड्ःमयाची आवड होती. बाबामहाराज यांच्या घडण्यामागे चुलते अप्पामहाराज आणि अन्नामहाराज यांचा मोठा वाटा आहे.
वयाच्या आठव्या वर्षापासून बाबामहाराज हे दादामहाराज यांच्या कीर्तनाला चाली लावायचे. तिथूनच त्यांच्यावर कीर्तनावर संस्कार रूजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहाब यांच्याकजे गायनाचे धडे घेतले.
कधीकाळी बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यावसायदेखील केला होता. समाजप्रबोधन कार्य म्हणून डिसेंबर 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबामहाराजांनी सुरू केली. पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बबामहाराजांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलं होतं. बाबामहाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. समाजासाठी त्यांनी केलेले हे कार्य अमुल्य आहे.