कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर, कैद्यांमध्ये दिसला सकारात्मक बदल, महाराष्ट्रात कुठे-कुठे झाला प्रयोग

| Updated on: Apr 04, 2025 | 7:36 PM

गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.

कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर, कैद्यांमध्ये दिसला सकारात्मक बदल, महाराष्ट्रात कुठे-कुठे झाला प्रयोग
महाराष्ट्रातील कारागृहात भगवद्गीता शिकवली जात आहे.
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

कोणताही गुन्हा संताप, द्वेष, घृणा यामुळे घडत असतो. परंतु गुन्हेगारांच्या आयुष्यात सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्यात बदल घडू शकतो. गीता परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कारागृहात एक वेगळा प्रयोग करण्यात आला. कैद्यांना भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिली गेली. महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांवर हा प्रयोग केला गेला. त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

४० मिनिटांचा मोफत वर्ग

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवारद्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ ‘टाईम स्लॉट्स ‘ मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संभाजीनगर कारागृहातून झाली सुरुवात

ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेत. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने यात कोल्हापूर, नाशिक, ठाणे, तळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५, ठाणे ३५, कोल्हापूर ४५, नाशिक ४०, तळोजा ३५, येरवडा १० कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहातील सुमारे १९० बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक अध्यायाचे विवेचनही

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. सध्या ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले.पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

शनिवारी व रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. यावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केली जाते. गीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेत. या चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातात. दुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जातात. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.