Ram Mandir : रामाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील पहिली एसटी बस अयोध्येला रवाना
एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या धुळे-अयोध्या बस सेवेला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच पहिली बस धुळ्याहून अयोध्येसाठी रवाना झाली आहे. या बसने अयोध्येला जाण्याची इच्छा असणाऱ्याला बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
मनेश मासोळे, धुळे : 22 जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यानंतर प्रत्येक राम भक्ताला प्रभू रामाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. महाराष्ट्रातून अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे मात्र, रेल्वे ठराविक शहरातून जात असल्याने अनेकांना त्याचा लाभ घेणे शक्य होत नाही. सर्व सामान्यांची लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या एसटी महामंडळाने पुढाकार घेत धुळ्यावरून थेट अयोध्येसाठी बस सेवा (Ayodhya Bus Service) सुरू केली आहे. धुळे ते अयोध्या जवळपास 2,800 किलोमीटर अंतराच्या या प्रवासासाठी दोन चालक असणार आहेत. नुकतीच अयोध्येसाठी धुळ्याहून पहिली बस रवाना झाली.
प्रवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद
एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या धुळे-अयोध्या बस सेवेला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच पहिली बस धुळ्याहून अयोध्येसाठी रवाना झाली आहे. या बसने अयोध्येला जाण्याची इच्छा असणाऱ्याला बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. पंधरा दिवसआधी या प्रवासाचे बुकिंग करणे शक्य आहे. 41 प्रवासी क्षमता असलेली ही बस पुणे, जळगाव ,नवापूर, पारोळा अक्कलकुवा, अमळनेर मार्गे जात असल्याने येथिल प्रवासीसुद्धा या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
ही बस पहाटे रवाना झाली त्यावेळी या बसला फुलांनी आणि फुग्यांनी सजवण्यात आली होती. त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजीदेखील करण्यात आली होती. पंधरा दिवसात या बस मधील सर्वच सीट बुक झाले. दोन ठिकाणी या बसचा थांबा राहणार आहे झाशी प्रयागराज अयोध्या या ठिकाणी ही बस जाणार असून दर्शन घेऊन ती परतणार आहे. या प्रवासासाठी 4500 भाडे असून प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. धुळे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक प्रमुख विजय गीते यांनी याबद्दल माहिती दिली.