सरकारची घोषणा कागदावरच, दिवाळी गोड करण्यासाठी गेलेले नागरिक रिकाम्या हाती परतले…
राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता.
Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेची दिवाळी (Diwali Festival) गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. स्वस्त धान्य दुकानात सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का ? असे विचारत आहे. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची कुठलीही स्पष्टता होत नाहीये. त्यामुळे शिंदे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे चित्र आहे.
त्यातच राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने 100 रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता.
शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक जण स्वस्त धान्य दुकानात जाऊन चौकशी करत आहे.
स्वस्त धान्य दुकानात दिवाळीच्या वस्तूंची चौकशी करायला गेलेल्या नागरिकांना मात्र अद्यापही रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.
दिवाळी अवघ्या 10 ते 12 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्यात अद्यापही दिवाळी वस्तूंबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे दिवाळी फराळ कधी बनवणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्यात सूत्रांच्या माहितीनुसार आणखी 3 दिवस दिवाळी वस्तु भेटण्यास विलंब होणार असल्याने नागरिकांना आणखी वाट पहावी लागणार आहे.
एकूणच दिवाळी गोड करण्याची घोषणा अद्यापही कागदावरच असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुरू पाहायला मिळत असून सरकारच्या घोषणेवरून चर्चेला उधाण आले आहे.