Diwali Special | शाही दिवाळीचा शाही अंदाज, रसरशीत बालुशाही यंदा करुनच पाहा

| Updated on: Oct 18, 2022 | 1:55 PM

हलवायाकडे मिळते तशी लज्जतदार बालुशाही करून यंदाची दिवाळी शाहीच बनवूया....

Diwali Special | शाही दिवाळीचा शाही अंदाज, रसरशीत बालुशाही यंदा करुनच पाहा
Image Credit source: social media
Follow us on

हल्ली सगळे डाएट कॉन्शियस झालेत. गोड पदार्थ टाळले जातात. पण सणासुदीला जिभेलाही थोडं तृप्त करायला हवं ना…  घरातली बच्चे कंपनी खुश होईल, अशा पदार्थांची  मागणी होतच राहते. दिवाळीनिमित्त (Diwali) बाजारपेठा सजल्यात. मिठाईची (Sweets) दुकानंही सज्ज आहेत. पण घरातच हलवायासारखी रसरशीत बालुशाही (Balushahi) बनवता आली तर…? हेल्थी आणि टेस्टीही… फक्त काही मिनिटात ही मस्त बालूशाई बनते… वाचा रेसिपी-

साहित्य-

  •  दोन कप मैदा
  • पाव चमचा मीठ
  • एक चमचा बेकिंग पावडर
  • पाव कप साजूक तूप

पाकासाठी साहित्य- दीड कप साखर, त्याच्या अर्ध म्हणजे तीन पाव कप पाणी घ्यायचं.

कृती-

  • मैदा, मीठ, बेकिंग पावडर, तूप एकत्र करून मिक्स करून घ्यायचं. याचं टेक्सचर रवाळ येईपर्यंत घोळत रहायचं. हातात दाबलं की गोळा झाला पाहिजे.
  • थोडं थोडं पाणी घालत गोळा करत जायचं. गोळा तयार करताना कणिक भिजवताना करतो तसं जोर लावायचा नाही. गोलाकार हात फिरवत रहायचा. जेणकरून पिठाला चांगलं टेक्सचर येतं.
  •  फार मऊ नाही आणि घट्ट नाही.. मध्यम प्रमाणात गोळा बनवून १५ ते २० मिनिट झाकून ठेवायचा.
  • बालूशाहीचं पीठ मुरेपर्यंत पाक तयार करून घ्यायचा.  साखर आणि पाणी वरील प्रमाणात घेऊन पाक बनवण्यासाठी ठेवावं. मध्यम आचेवर उकळून घ्यावं.
  • बालुशाहीसाठी एकतारी पाक करायचा. चमच्यातून थेंब खाली पडताना हळू हळू खाली पडेपर्यंत तो करायचा.
  •  पाक हवा तसा झालाय की नाही, हे पाहण्यासाठी एका डिशमध्ये एक थेंब टाकायचा. तो दवबिंदूसारखा दिसला पाहिजे. पसरला असेल तर अद्याप झाला नाही.
  •  एकतारी पाक तयार झाल्यानंतर त्यात विलायची पूड आणि हवा असेल तर थोडा केशरी रंग घालायचा.
  •  आता बालुशाही बनवण्यासाठी पीठाचा एक छोटा गोळा करून घ्यायचा.
  •  या गोळ्यात एका गोलाकार रवीच्या सहाय्याने आरपार मध्यभागी छिद्र करून घ्यायचं.  असं छिद्र पाडल्याने तळताना पूर्ण आतपर्यंत तळली जाते. कच्ची रहात नाही.
  •  तळण्यासाठी तेल किंवा तूप. जास्त आचेवर गरम करायचं आणि त्यानंतर मंद आचेवर गॅस ठेवायचा.
  • मंद आचेवर असताना तेलात बालुशाही सोडायची. एकदाच पाच-सहा टाकल्या तरी चालतात.  सोनेरी रंग आल्यावर पलटून घ्यायची. नंतर कढईतून काढायची.
  • पाक गरम असतानाच गरम तळलेली बालुशाही त्यात टाकायची. जेणेकरून तिच्या आतपर्यंत पाक मुरतो.
  •  पाक गॅसवरही नसावा आणि थंडही नसावा.  दोन मिनिटं पाकात टाकल्यानंतर त्या पलटून घ्याव्यात.
  • 4-5  मिनिटं पाकात मुरल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. हवेत ठेवायच्या.