पुणे | 19 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसाच्या आगमनासोबत गणरायाचे आगमन धुमधडाक्यात होत आहे. सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. पुणे शहरातील अनेक मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 10:23 प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. दगडूशेठ गणपतीची मुख्य मंदिरापासून 8:30 वाजता निघाली. हनुमान रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
पुणे येथील मानाच्या पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पारंपारिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून श्रीची मिरवणूक निघाली आहे. कसबा गणपती पेशवेकालीन आहे. या गणपती मंदिराला सुमारे १४०० वर्षांचा इतिहास आहे. १८९३ साली कसबा पेठेतील गणेशोत्सवाला सुरुवात झाली. मानाचा पहिला गणपती असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा सुरुवात कसबा गणपतीपासूनच होतो.
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरणुकीत ढोल, ताशांचा गजर आणि पारंपारिक पेहरावात मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मंडळाच्या श्री च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा 11:50 वाजता होणार आहे. मंडळाने प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाइन केला आहे. यामुळे भाविकांना घरी बसल्या दर्शन घेता येणार आहे. भाऊ रंगारी मंडळाचे 132 वे वर्ष आहे.
पुणे शहरातील गणेश उत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
गणेशोत्सवादरम्यान शहरात 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी 1,800 सीसीटीव्ही तैनात केले आहे. यामुळे २४ तास लक्ष ठेवता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात भव्य मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि डिजे, लायटिंगशोमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक निघाली आहेत. निघोटवाडीचा राजा आणि मोरडेवाडीच्या मोरेश्वराचे वाजतगाजत आगमन झाले आहे. मंडळाचे 38 वे वर्ष असून संपूर्ण गणेशोत्सवात विविध मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक पर्यावरण जागृतीसाठी उपक्रम राबवणार आहे.