मुंबई : देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2023) धूम आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आनंद प्रत्येक घरात आणि परिसरात पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा आणि सेवा करण्यात सर्वच जण मग्न आहेत. गणेशेत्सवाच्या निमीत्त्याने आम्ही तुम्हाला भारतातील अशा गणपती मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे गणपती प्रत्येक प्रेमी युगूलाचा नवस ऐकतो आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. वाचून आश्चर्य वाटत असेल तरी हे खरं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये असलेले इश्किया गणेश मंदिर (Ishkiya Ganesh) खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला येथे जत्रा भरते आणि मोठ्या संख्येने प्रेमी युगुल नवस बोलण्यासाठी येथे येतात. हे मंदिर खास का आहे ते आपण जाणून घेऊया.
इश्किया गणेश मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याने अविवाहित प्रेमीयुगुलांचे लग्न लवकर होते, अशी मान्यता आहे. गणपतीच्या कृपेने त्यांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी मिळतो. वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध मधुर होतात. प्रेमी युगुलांव्यतिरिक्त प्रत्येक वयोगटातील इतर भाविक देखील येथे आपल्या इच्छेने येतात आणि गणपतीला साकडं घालतात.
जोधपूरमधील इश्किया गणेश मंदिराची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झाल्याचे स्थानिक लोक सांगतात. शहरातील एका अरुंद गल्लीतील घराबाहेर गुरू गणपती नावाच्या या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्याचे बांधकाम असे आहे की येथे उभी असलेली व्यक्ती दुरून सहज दिसू शकत नाही. त्यामुळेच प्रेमीयुगुल त्यांच्या पहिल्या भेटीसाठी छुप्या पद्धतीने येथे येत असत. हळुहळु हे मंदिर जोडप्यांची पसंती बनले आणि मुलं-मुली येथे भेटायला येऊ लागले.
येथे आल्यावर त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन लग्नाची इच्छा व्यक्त केली. अनेकांची लग्न जुळली. हळू हळू या गणपतीची लोकप्रियता वाढत गेली. लग्नाचा नवस बोलल्यानंतर जोडपे मंदिरात दर्शनाला येऊ लागले. अशा प्रकारे हे मंदिर गुरू गणपतीपासून इश्किया गणेश मंदिर या नावाने प्रसिद्ध झाले.
या मंदिरात दर बुधवारी प्रेमीयुगुलांचा मेळा भरतो. येथे अनेक भाविक विवाहाचा नवस करण्यासाठी येतात. गणपतीला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठीसुद्धा अनेक भक्त येतात. तसेच अनेक भक्त त्यांचे आभार मानण्यासाठी येतात. हे मंदिर पहाटे 5 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 9 या वेळेत उघडते. बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन घेता येते. गणेश चतुर्थीला दिवसभर विशेष पूजा केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)