Ganga Saptami 2022: गंगेच्या प्रकट दिवसाला गंगा सप्तमी (Ganga Saptami) किंवा गंगा जयंती या नावाने ओळखलं जातं. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी गंगा सप्तमी ही 8 मे रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. गंगेला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पाप मिटतात अशी मान्यता आहे. गंगेला मोक्षदायिनीही म्हटलं जातं. गंगा सप्तमीला गंगा स्नान किंवा गंगा पूजा (Ganga Puja) केल्यास भूतकाळातील सर्व पाप दूर होतात आणि सर्व त्रासांपासून सुटका होते असं मानलं जातं. धन-वैभव आणि सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा खूप फायदा होतो. हे उपाय कोणते ते पाहुयात..
जन्म-जन्मांतराचे पाप दूर करण्यासाठी-
असं म्हटलं जातं की गंगा सप्तमीचा दिवस इतका पवित्र असतो की यादिवशी तुम्ही जर गंगा स्नान केलं तर तुमचे जन्मजन्मांतराचे पाप दूर होतात आणि घरातील धनधान्याशी संबंधित समस्या सुटतात. गंगाजल जरी शरीरावर शिंपडलं तरी सर्व पाप मिटले जातात अशी मान्यता आहे. जर तुम्ही गंगा घाटावर जाऊ शकला नाहीत तर घरीच एका पात्रात सामान्य पाण्यात गंगाजल मिसळून त्याने स्नान करू शकता.
मनोकामना पूर्ण होण्यासाठी-
जर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल तर गंगा सप्तमीला घरात पूजेच्या स्थानी एका वाटीमध्ये गंगाजल भरून ठेवावं. त्यानंतर गंगेची विधीविधान पूजा करावी. तुपाचा दिवा लावून मंत्रजाप करत आरती करावी. नैवेद्य दाखवून गंगेला आपली मनोकामना, इच्छा सांगावी आणि ती पूर्ण करण्याची विनंती करावी. त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावं. अशाने घरातील नकारात्मकताही दूर होते.
पुण्यप्राप्तीसाठी-
शास्त्रांमध्ये दान-पुण्याचं विशेष महत्त्व सांगितलं गेलंय. गंगा सप्तमीला दान करणं श्रेष्ठ मानलं जातं. यादिवशी आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करावं. यादिवशी दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं.
सौभाग्य प्राप्तीसाठी-
गंगा सप्तमीला शंकराचीही पूजा केली जाते. यादिवशी गंगाजलमध्ये पाच बेलपत्र टाकून शिवलिंगावर जलाभिषेक करावं. असं केल्यास शंकर, देवी पार्वती आणि गंगेचा आशीर्वाद मिळतो आणि सौभाग्यवृद्धी होते.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही धार्मिक आस्था आणि जनमान्यतेवर आधारित आहे. त्याचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही.)