मृत्यूनंतर आत्मा स्वर्गात किंवा नरकात किती दिवस राहतो?
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा 24 तास यमलोकात राहतो, त्यानंतर १३ दिवस नातेवाईकांसोबत. नंतर स्वर्ग, पितृलोक किंवा नरक यापैकी एका मार्गाने प्रवास होतो.

आपल्याला लहानपणापासून चांगली काम करणाऱ्याला स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य करणाऱ्याला नरकात शिक्षा मिळते, असे ऐकायला मिळते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर तिथेच राहते, मात्र आत्मा शरीरातून निघून जातो. मात्र स्वर्गात किंवा नरकात आत्मा नेमका किती दिवस राहतो, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. या प्रश्नाचे उत्तर गरुड पुराणात देण्यात आले आहे.
गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींबद्दलचा उल्लेख देण्यात आला आहे. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणापैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्री हरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. गरुड पुराणात जीवन-मृत्यू आणि मृत्यू नंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्मा सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत आल्यानंतर आत्मा शरीर सोडते आणि त्याच्यासोबत यमलोकाकडे निघून जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात. त्या व्यक्तीने आयुष्यात कोणकोणत्या चांगल्या-वाईट गोष्टी केल्या आहेत, याची माहिती देतात. यानंतर पुन्हा त्या आत्म्याला त्याच्याच घरात सोडले जाते, जिथे त्याने संपूर्ण आयुष्य घालवले आहे.
गरुड पुराणात नेमकं काय सांगितले?
यानंतर 13 दिवस आत्मा त्याच्या नातेवाईकांसोबत राहतो. गरुड पुराणानुसार, 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात. स्वर्ग लोक, पितृ लोक आणि नरक लोक असे तीन मार्ग असतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कर्माच्या आधारे त्याला कोणत्या मार्गावर पाठवायचे हे निश्चित केले जाते. स्वर्ग लोक हा मार्ग ब्रह्मलोक आणि देवलोकाच्या दिशेने घेऊन जातो. हा पुण्यवान आणि सत्कर्म करणाऱ्या आत्म्यांसाठी असतो. पितृ लोक हा मार्ग पितृलोकात घेऊन जातो. पूर्वजांच्या लोकात जाणाऱ्या आत्म्यांचा हा मार्ग असतो. त्यासोबतच नरक लोक हा मार्ग नरकाच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. पापी आत्म्यांना या मार्गाने नरकात पाठवले जाते.
…अन् माणसाचा पुनर्जन्म होतो
जर एखाद्या व्यक्तीने चांगली कृत्ये केली असतील तर मृत्यूनंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. त्याच्या सत्कर्मांचे फळ मिळेपर्यंत तो तिथेच राहतो. जेव्हा सद्गुण संपतो तेव्हा माणसाला पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. श्रीमद्भगवद्गीतेनुसार देवतांची पूजा करणारे लोक स्वर्गात जातात. परंतु जेव्हा त्यांचे पुण्य पूर्ण होते, तेव्हा ते पुनर्जन्म घेतात. जर एखाद्या व्यक्तीने पाप केले असेल, तर त्याला यमलोकात स्थान मिळते. या ठिकाणी त्याला नरकात शिक्षा भोगावी लागते. हा काळ त्याच्या पापांच्या गांभीर्यानुसार बदलतो. गरुड पुराण आणि इतर धार्मिक शास्त्रांनुसार, नरकात अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. जेव्हा पापांची शिक्षा पूर्ण होते, तेव्हा आत्म्याला पुनर्जन्मासाठी पाठवले जाते.
जेव्हा आत्म्याचे पुण्य किंवा पाप पूर्ण होते, तेव्हा तो त्याच्या कर्मांनुसार नवीन शरीरात जन्म घेतो. पुनर्जन्माचे हे चक्र आत्म्याला मुक्ती मिळेपर्यंत चालू राहते. जेव्हा आत्म्याला मोक्ष प्राप्त करतो त्यानंतर तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रात परत येत नाही. थोडक्यात, स्वर्ग किंवा नरकात राहण्यासाठी कोणताही विशिष्ट वेळ नाही. हे त्या व्यक्तीच्या पुण्य आणि पापांवर अवलंबून असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)