Gudi Padwa 2024 : गुढी पाडवा कधी? शुभ मुहूर्त काय? का आणि कसा साजरा करतात मराठी नववर्ष दिन ?
यंदा 9 एप्रिल रोजी महिन्यात गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्ष दिन आहे. या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे ? हा सण का आणि कशासाठी साजरा केला जातो ? फक्त महाराष्ट्रातच हा दिवस साजरा केला जातो का? इतर राज्यात या दिवसाला काय नावाने संबोधतात? या दिवशीचा मुहूर्त असतो का? या सर्व प्रश्नांचा आढावा या बातमीत घेण्यात आला आहे.
चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्ष साजरा केलं जातं. हा दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव मुख्यत: महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्रप्रदेशात साजरा केला जातो. गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात असते. हिंदूंसाठी या सणाचं सांस्कृतिक महत्त्व आहे. मराठमोळी माणसं या दिवशी घराच्याबाहेर समृद्धीचं प्रतिक असलेली गुढी उभारतात. यावेळी खास पारंपारिक पोषाखात पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते.
यंदा 9 एप्रिल रोजी गुढी पाडवा उत्सव आहे. या दिवसापासून हिंदू नव वर्ष विक्रम संवत 2081 आणि शुभ चैत्र नवरात्रीची सुरुवातही होत आहे. काही राज्यांमध्ये उगादी, चेटी चंद आणि युगादी आदी नावानेही गुढी पाडव्याला संबोधले जाते. नाव काही असले तरी उत्सव साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे. तसेच उत्सवाचं महत्त्वही मोठं आहे.
शुभ मुहूर्त काय?
हिंदी कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीची सुरुवात 8 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटाने होणार आहे. या तिथीची समाप्ती 9 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे उदया तिथीच्या अनुसार गुढी पाडव्याचा उत्सव 9 एप्रिल रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे.
पाडव्याचं महत्त्व
गुढी शब्दाचा अर्थ झेंडा किंवा बॅनरशी संबंधित आहे. तर पाडव्याचा अर्थ महिन्याशी येतो. हे रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतिक आहे. याच दिवशी भगवान ब्रह्माने ब्रह्मांडाच्या निर्माणाची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचं प्रतिक म्हणूनही महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा केला जातो. मान्यतेनुसार गुढी पाडवा सत्य आणि धार्मिकताच्या युग, सतयुगाची सुरूवातीचंही प्रतिक मानलं जातं.
घरावर गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात. जीवनात समृद्धी येते. सौभाग्य मिळतं, असं मानलं जातं. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगववेगळ्या नावाने संबोधले जाते. संवत्सर पडवो, उगादी, युगादी, चेटी चंद किंवा नवरेह आदी नावानेही हा सण ओळखला जातो. पूर्वेकडील मणिपूर राज्यात साजिबू नोंगमा पनबा चेईराओबा नावाने हा सण साजरा केला जातो.
कसा साजरा करतात उत्सव ?
गुढी पाडव्याच्या दिवशी महिला सकाळीच उठून स्नान करतात. त्यानंतर घरातील गुढी सजवतात. गुढी पारंपारिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केली जाते. त्यावर चांदी, तांबे किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो. नंतर त्यावर स्वास्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्यांनी तसेच लिंब किंवा आंब्याच्या पानांनी आणि फुलांनी सजवले जाते. त्यानंतर घराच्याबाहेर उंचावर ही गुढी लावली जाते. गुढी लावल्यानंतर पूजा केली जाते.
त्यानंतर संपूर्ण घर रंगीत फुलांनी सजवलं जातं. घराबाहेर रांगोळी काढली जाते. घराला अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं. या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. या दिवशी मिरवणुका आणि शोभा यात्रा काढल्या जातात. संध्याकाळी घरी पुरणपोळी आणि श्रीखंडाचा बेत आखला जातो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी गोडधोड करत असतो. या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून आंघोळ करण्याचीही परंपरा आहे. या दिवशी आरोग्या चांगलं राहण्याची कामना केली जाते.
गुढी पाडवा का साजरा करतात?
गुढी पाडव्याच्या अनेक पौराणिक आणि दंतकथा आहेत. या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जातं. याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचं युग पुन्हा सुरू झाल्याचंही सांगितलं जातं. त्याचमुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते.
एका कथेनुसार, रावणाला पराभूत केल्यानंतर 14 वर्षाचा वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला आले होते. त्यामुळे प्रभू रामाच्या विजयाचा जल्लोष म्हणूनही गुढी पाडवा साजरा केला जातो. गुढी म्हणजे ब्रह्माचा झेंडा घरात फडकवला जातो. प्रभू रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचा ध्वज म्हणूनही या गुढीकडे पाहिजे जाते.
या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक सत्य सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना पराभूत करून राज्याला मोगल शासनाच्या तावडीतून मुक्त केलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक म्हणून महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. प्रजेच्या राजाचं स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली जाते, असं सांगितलं जातं.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)