Ganeshotsav 2022: इश्किया गणेश, प्रेमी युगुलाने दर्शन घेतल्यास जुळून येतो लग्नाचा योग, कुठे आहे हा गणपती?
स्थानिकांच्या मते हे मंदिर शहरापासून दूर होते. या परिसरात विशेष वर्दळ नसायची. एकांतात वेळ घालविण्यासाठी अनेक प्रेमी युगुल या मंदिरात येत असे. या मंदिरात अनेकांनी प्रेमातले विघ्न दूर होण्यासाठी आणि लग्न जुळण्यसाठी प्रार्थना केली. योगायोगाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या.
देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) धूम सुरू असून, या दहा दिवसांच्या उत्सवाचा आनंद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या दिवसात अनेक भाविक गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांना (Famous ganpati temple) देखील भेट देतात. देशात अनेक ठिकाणी गणरायाची प्रसिद्ध मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असे मंदिर आहे जिथे प्रेमी युगुलाने दर्शन घेतल्यास लग्नाचा योग जुळून येतो. इतकेच काय तर या गणपतीचे नाव देखील अनोखे आहे. राजस्थानच्या जोधपूर येथे असलेला हा गणपती इश्किया गणेश (Ishkiya Ganesh) नावाने प्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थीला दरवर्षी याठिकाणी जत्रा भरते आणि मोठ्या संख्येने प्रेमी युगुल बाप्पाला साकडे घाण्यासाठी मंदिरात येतात.
प्रेमातले विघ्न दूर करतो गणपती
100 वर्षांचा इतिहास असलेले हे इश्किया गणेश मंदिर राजस्थानच्या जोधपूर येथे आहे. या मंदिराची स्थापना गुरु गणपती मंदिर म्हणून करण्यात आली होती. अनेक प्रेमी युगुलांच्या आयुष्यातले विघ्न दूर होऊन ते एकत्र आले. अनेक जोडप्यांचा लग्नाचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर हा गणपती इश्किया गणेश नावाने प्रसिद्ध झाला. या मंदिरात प्रेमी युगुलांची गर्दी पाहायला मिळते. याशिवाय विवाह इच्छुक तरुण-तरुणी देखील या गणपतीचे दर्शन घेतात. लग्नासाठी गणपतीला नवस बोलल्यास तो पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
इश्किया गणेश हे नाव कसे पडले?
स्थानिकांच्या मते हे मंदिर शहरापासून दूर होते. या परिसरात विशेष वर्दळ नसायची. एकांतात वेळ घालविण्यासाठी अनेक प्रेमी युगुल या मंदिरात येत असे. या मंदिरात अनेकांनी प्रेमातले विघ्न दूर होण्यासाठी आणि लग्न जुळण्यसाठी प्रार्थना केली. योगायोगाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. हळूहळू ही बातमी पसरू लागली आणि मंदिरात येणाऱ्या प्रेमी युगुलांची संख्या वाढू लागली. अशा प्रकारे या गणपतीला इश्किया गणपती हे नाव पडले. दर बुधवारी या मंदिरात प्रेमी युगुलांची गर्दी होत असते. याशिवाय गणेश चतुर्थीला जत्रा देखील भरते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)