आषाढी वारीच्या (Ashadhi wari) प्रस्थानासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी (sant Tukaram Maharaj Palkhi) सज्ज झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी मुख्य मंदिर, पालखी आणि रथ फुलांनी सजविण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूर वारी होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. संत नामदेवांची पालखी काल रविवारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे. या पालख्यांना कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेसाठी पालखी मार्गावर सुमारे 1800 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एसआरपीएफ च्या दोन तुकड्या आणि होमगार्ड देखील तैनात राहतील. वारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे, प्रसाधनगृह, वारकऱ्यांसाठी सोयी-सुविधा याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी वारीमध्ये साध्य वेशात पोलीस असणार आहेत. संत तुकोबांच्या वारीचे यंदाचे 337 वे वर्ष आहे.
या निमित्त्याने देवस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. प्रस्थानांतर पहिला मुक्काम हा मंदिरामागे असणाऱ्या इनामदार वाड्यात असेल. तिथून पालखी आकुर्डी, पुणे, लोणी, बारामती मार्गे 2 जुलैला इंदापुरीला पोहोचेल. त्यानंतर पूढे अकलूज, पिराची कुरोली मार्गे आठ जुलैला वाखरीमध्ये मुक्काम करेल. पंढरपूरच्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात 9 जुलैला मुक्काम आणि 10 जुलैला आशादी एकादशीच्या दिवशी विठूरायाची भेट घडेल.