Vastu Tips : तुमचा बेडरूम या दिशेला तर नाही ना…! जर असेल तर वास्तुशास्त्रानुसार असा त्रास जाणवणार
Vastu Tips for Bedroom : वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला बेडरुम असल्यास तणाव, निद्रानाश, अस्वस्थता आणि भीती या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.
वास्तुशास्त्रात घरातील कोणत्या कोपऱ्यात आणि दिशेला काय असावं? याला फार महत्व आहे. कोणत्या दिशेला काय ठेवावं आणि काय नाही? याबाबत वास्तुशास्त्रात उल्लेख आहे. मेहनतीशिवाय यश मिळत नाही आणि यशस्वीही होता येत नाही. मात्र यशस्वी होण्यासाठी जसं मेहनत करावी लागते तसंच नशिबाची साथ असणंही महत्वाचं ठरतं. तसंच तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात किंवा होणार आहात? यातही वास्तुशास्त्राची महत्त्वाची भूमिका असते. वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही घरातील कोणत्या दिशेला काय ठेवता, त्यानुसार तुमच्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कुठे काय ठेवायला हवं? तसंच कोणत्या वस्तूची योग्य दिशा कोणती? हे जाणून घेऊयात.
आग्नेय, नेऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 4 उपदिशा आहेत. आग्नेय कोन म्हणजे पूर्व आणि दक्षिण या दिशेमधील स्थान होय. या दिशेला सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. या दिशेला सूर्यकिरणांची तीव्रता अधिक असल्याने कोणतीही वस्तू ठेवण्याआधी अनेकदा विचार करा.
या वस्तू ठेवणं टाळा!
त्यामुळे आग्नेय कोनात लवकर गरम होणारी वस्तू ठेवू नये. तसेच ज्वलनशील वस्तू आणि वीजेवरील उपकरणं या दिशेला ठेवू नयेत. या दिशेला लवकर गरम होणाऱ्या वस्तू आणि वीजेवरील उपकरणं ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो. ज्यामुळे कुटुंबावर संकट ओढावू शकतं.
वास्तुशास्त्रानुसार, अग्नी आणि पाणी हे एकमेकांची विरुद्ध तत्वे आहेत. त्यामुळे पाण्याशी संबंधित वस्तू आग्नेय दिशेला ठेवणं टाळावं. या दिशेला पाण्याची टाकी, बोरिंग, नळ किंवा हातपंप बसवू नये. तसं केल्यास नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. तसेच संबंधित व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
बेडरुम कोणत्या दिशेला हवं?
वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय कोन ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे आग्नेय कोनात बेडरुम नसावं. आग्नेय कोनात बेडरुम असल्यास तणाव, निद्रानाश, अस्वस्थता आणि भीती या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)