Kojagiri Purnima 2022: ‘या’ तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा, चंद्राच्या प्रकाशात दूध आटविण्यामागे काय आहे कारण?
शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास काय फायदा होतो तसेच धार्मिक दृष्ट्या याला काय महत्त्व आहे जाणून घेऊया.
मुंबई, आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2022) किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा केल्यानंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. या दिवशी दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तररात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.
शरद पौर्णिमा तिथी
आश्विन शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा तिथी रविवार, 09 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 03:41 पासून सुरू होईल. पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल.
शास्त्रानुसार, शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी तिच्या वाहनावर स्वार होऊन पृथ्वीवर फिरते आणि भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी वरदान देते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठीही उत्तम मानली जाते.
कोजागिरी पौर्णिमेला दूध आटविण्याचे महत्त्व
असे मानले जाते की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लाभदायक असते. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष मानले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)