दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबईतील मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांतील गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे.
मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्लीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुरुवात झाली. यावेळी बाप्पाच्या मूर्तीवर फुलांची उधळण करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात राजा तेजुकायाच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.
लालबाग, परळ, चिंचपोकळी, गिरगाव या मुंबईतील परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. मुंबईतील रस्त्यांवर आज ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतिषबाजीसह विसर्जन मिरवणुकांची धूम पहायला मिळतेय.
मुंबईच्या रस्त्यांवर लाखोंच्या संख्येने गणेशभक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करत आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अनेक भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
गुरुवारी सकाळपासूनच लालबाग, परळ, चिंचपोकळी भागात गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
सर्वप्रथम मुंबईचा राजा मिरवणुकीसह बाहेर पडल्यानंतर तेजुकाया गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. यात लालबागचा राजादेखील विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे.