Lunar Eclipse 2023 : शरद पौर्णिमेच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, असा होणार परिणाम
भारताशिवाय अनेक देशांमध्येही चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य प्रदेश, हिंदी महासागर, दक्षिण प्रशांत महासागर या भागात दिसणार आहे.
मुंबई : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले होते. हे ग्रहण जगभरात अनेक भागात दिसले पण भारतात हे ग्रहण दिसले नाही. पण, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण केव्हा होईल आणि सुतक कालावधीची वेळ काय असेल ते जाणून घेऊया.
चंद्रग्रहण तारीख आणि वेळ
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आश्विन पौर्णिमेला म्हणजेच 28 आणि 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री संपूर्ण भारतभर खंडग्रासच्या रुपात दिसणार आहे. चंद्रग्रहण मध्यरात्री 1:05 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:24 पर्यंत चालेल. हे चंद्रग्रहण भारतातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे.
चंद्रग्रहणाचा सुतक काळ
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.05 वाजता सुरू होणार आहे.
कुठे दिसणार चंद्रग्रहण?
भारताशिवाय अनेक देशांमध्येही चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका, दक्षिण-पूर्व अमेरिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य प्रदेश, हिंदी महासागर, दक्षिण प्रशांत महासागर या भागात दिसणार आहे.
ग्रहण काळात आणि नंतर काय करावे?
सुतक आणि ग्रहण काळात तुम्ही चंद्राशी संबंधित मंत्रांचा जप करू शकता. 28 ऑक्टोबरच्या ग्रहण काळात सूर्यास्तानंतर आपल्या क्षमतेनुसार आणि ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार दान करण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून ब्राह्मणास दान द्यावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)