अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. त्या आधी यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बनवण्यात आलेल्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचेही उद्घाटन होणार आहे. अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 1,450 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे बांधकाम करण्यात आले आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6,500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग राम मंदिराच्या वास्तुकला दर्शवतो. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी चित्रे सजलेली आहेत. तसेच टर्मिनल इमारतीत अत्याधुनिक सुविधा असतील.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अयोध्या विमानतळाचे नाव देखील बदलण्यात येणार आहे. आता अयोध्या विमानतळ ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ म्हणून ओळखले जाईल. गेल्या बुधवारी अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले होते. अयोध्या रेल्वे स्थानक आता ‘अयोध्या धाम’ म्हणून ओळखले जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मागणीवरून रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी रेल्वे स्थानक आणि विमानतळ या दोन्ही ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. येथे पंतप्रधान मोदी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी अयोध्यामध्ये विशेष तयारी करण्यात येत आहे. स्वच्छतेबरोबरच विविध ठिकाणे फुलांनी सजवली जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दररोज अयोध्येला भेट देत आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्या जंक्शनची पाहणी करण्यासाठी आले होते. जंक्शनचे नाव बदलून ‘अयोध्या धाम’ करण्याची इच्छा त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. सीएम योगींच्या या इच्छेवर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि बुधवारी अयोध्या जंक्शनचे नाव बदलून अयोध्या धाम केले. ऑक्टोबर 2021 मध्ये सीएम योगी यांनी फैजाबाद जंक्शनचे नाव बदलून अयोध्या कॅंट करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्तावही त्यांच्या बाजूने केंद्राकडे पाठवण्यात आला होता. केंद्राने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि फैजाबाद जंक्शनचे नामकरण अयोध्या कॅंट असे केले.