भारतातल्या या ठिकाणी खेळली जाते स्मशानात होळी, गुलाला ऐवजी उधळले जाते चितेवरचे भस्म
08 मार्च 2023 रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे. शिवभक्त काशीच्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर विचित्र होळी खेळतात.
मुंबई : 08 मार्च 2023 रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाणार आहे मात्र बाबा विश्वनाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये रंगभरी एकादशीच्या दिवसापासून होळीची सुरुवात होते. शिव भक्त काशीच्या मणिकर्णिका (Manikarnika Ghat Holi) आणि हरिश्चंद्र घाटावर एक आगळी वेगळी आणि विचित्र होळी खेळतात. काशीच्या होळीच्या विचित्र आणि अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेऊया.
स्मशानभूमीत होळी खेळण्याची परंपरा
काशीमध्ये होळी खेळण्याची परंपरा वेगळी आहे. काशी शहराला मोक्षदायिनी नगरी म्हणतात. येथे हरिश्चंद्र घाट आणि मणिकर्णिमा घाट आहे. गेल्या कित्तेक हजार वर्षांपासून इथे एकही दिवस असा गेलेला नाही की अंत्यसंस्कार झालेला नसेल. इथे रोज चिता जळत राहतात आणि अंत्ययात्रा सुरूच असते. पण शोकांनी भरलेल्या या घाटात वर्षातील एक दिवस असा येतो की इथे रंगांनी नव्हे तर चितेच्या राखेने होळी खेळली जाते. रंग आणि गुलालाने नव्हे तर स्मशानभूमीतील चितेच्या राखेने होळी खेळावी, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर हे ऐकून तुम्हाला भीती वाटेल. पण अशी विचित्र होळी काशीत खेळली जाते.
‘मसाने की होळी’ची परंपरा काय आहे?
काशीमध्ये होळी साजरी करण्याच्या परंपरेची सुरुवात भगवान शंकरापासून झाल्याचे मानले जाते. प्राचीन मान्यतेनुसार, रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शिवाने माता गौराला नृत्य करून काशीत आणले. त्यानंतर रंगांनी आणि गुलालाने होळी खेळली. पण स्मशानभूमीत राहणारे भूत, पिशाच, यक्ष गंधर्व इत्यादींशी त्यांना होळी खेळता आली नाही. म्हणूनच रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिवजींनी स्मशानभूमीत राहणाऱ्या भूत आणि पिशाचांसह होळी खेळली. रंगभरी एकादशीपासून संपूर्ण 6 दिवस येथे होळी साजरी केली जाते. काशीतील हरिश्चंद्र घाटावर महाशमशन नाथांच्या आरतीनंतर सुरुवात होते. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)