Mokshada Ekadashi 2022: आज मोक्षदा एकादशी, महत्त्व आणि पूजा विधी
आज मोक्षदा एकादशी आहे. या दिवशी केलेल्या व्रताने मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. जाणून घेऊया या व्रताबद्दलची माहिती
मुंबई, मार्गशीष महिन्यात अनेक उपवास आणि व्रत पाळले जातात. या सर्वांमध्ये एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, मोक्षदा एकादशी व्रत (Mokshada Ekadashi Vrat) दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत दोन दिवस पाळले जाणार आहे. पहिल्या दिवशी गृहस्थ आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव समाजातील लोक उपवास करतील. मोक्षदा एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
मोक्षदा एकादशी शुभ मुहूर्त
मोक्षदा एकादशी सुरू – 2 डिसेंबर 2022 संध्याकाळी 5.39 वाजता
मोक्षदा एकादशी संपेल – 3 डिसेंबर 2022 संध्याकाळी 5.34 वाजता
पारण (उपवास सोडण्याची) वेळ – 4 डिसेंबर 13:14 ते 15:19
वैष्णव मोक्षदा एकादशी – 4 डिसेंबर 2022, रविवार
मोक्षदा एकादशीचे महत्व
मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. यामुळे व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. म्हणूनच याला गीता जयंती असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने आणि व्रत पाळल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. यासोबतच देवता आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता वाचणे किंवा पाठ करणे शुभ मानले जाते. असे केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मोक्षदा एकादशी पूजा पद्धत
- एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून संन्यास घ्यावा, स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
- यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करत व्रताला सुरुवात करा.
- श्री हरी विष्णूची आराधना सुरू करा. यासाठी लाकडी चौरंगावर पिवळ्या रंगाच्या कापडावर भगवान विष्णूचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा.
- सर्व प्रथम, थोडे गंगाजल शिंपडा. यानंतर पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा.
- भगवान विष्णूला तुळशीची, फुले, हार, नैवेद्य, भोग अर्पण करा.
- देवासमोर तुपाचा दिवा लावा. धूप जाळा.
- एकादशीच्या कथा वाचनासोबत भगवान विष्णूचा मंत्र आणि चालीसा पाठ करा.
- शेवटी विधिवत आरती करा.
- शक्य असल्यास पूर्णवेळ उपवास ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)