भारताच्या या मंदिरात होते कुत्र्यांचे नामकरण, पुजारी कुत्र्याच्या कानात सांगतात नाव
तिरुवप्पन वेल्लाट्टम मंदिरात अशी परंपरा आहे की, कुत्रा पाळल्यानंतर त्याला या मंदिरात दर्शनासाठी आणले जाते. स्थानिक लोकं सांगतात की..
मुंबई, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील प्रथा आणि परंपरा आश्चर्य करणाऱ्या आहेत. अशाच एका प्रथेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोकांच्या श्रद्धेला कुठलीच सिमा नाही. आज आपण केरळमधील एका अनोख्या ठिकाणाबद्दल जाणून घेऊया, जगाच्या पाठीवर अशी आगळीवेगळी परंपरा कदाचीतच कुठे पाहायला मिळेल. केरळच्या कन्नूर जिल्ह्यात एक मुथप्पन मंदिर (muthappan temple)आहे जिथे लोकं पाळीव कुत्र्यांना त्यांच बारसं करण्यासाठी घेऊन येतात. हे वाचून तुम्ही म्हणाल, काय गौडबंगाल आहे? परंतु या मंदिरात हे खरच घडतं.
भारताच्या या मंदिरात होते कुत्र्यांचे नामकरण
कन्नूरमधील तालिपरंबापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वलपट्टनम नदी आहे, तिच्या काठावर एक मंदिर आहे. या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर असल्याचे येथील स्थानिक लोकं सांगतात. असे म्हणतात की येथे लोकं दूरवरून आपले पाळीव कुत्रे नामकरणासाठी आणतात. माहितीनुसार, तिरुवप्पन वेल्लाट्टम येथे सुरू असलेली ही परंपरा अती प्राचीन आहे. याबाबतची अधिक माहिती येथील मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली. याठिकाणी कुत्र्यांचा नामकरण सोहळा आयोजित केला जातो, असे ते म्हणाले. यासाठी मंदिर कोणतेही शुल्क आकारत नाही.
अशा प्रकारे पार पडतो नामकरण विधी
तिरुवप्पन वेल्लाट्टम मंदिरात अशी परंपरा आहे की, कुत्रा पाळल्यानंतर त्याला या मंदिरात दर्शनासाठी आणले जाते. स्थानिक लोकं सांगतात की शनिवारी आणि रविवारी येथे खूप गर्दी असते. इथल्या पुजाऱ्याला मुथप्पन थेय्यम म्हणतात आणि नामकरण करताना ते कुत्र्याच्या कानात त्याचे त्याचे नाव सांगतात आणि त्यानंतर त्याला प्रसाद खायला देतात.
ताडी आणि तळलेले मासे अर्पण करतात भक्त
मुथप्पन हा गरीब आणि कष्टकरी जनतेचा देव मानला जातो. भगवान मुथप्पनला ताडी आणि तळलेले मासे अर्पण केले जातात. लोकं त्यांना याचा नैवेद्य दाखवितात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुत्र्यांना मुथप्पनचे साथीदार मानले जाते. त्यामुळे या मंदिरात कुत्र्यांचीही पूजा केली जाते. स्थानिक लोकं भगवान मुथप्पन यांना धर्मनिरपेक्ष देवता मानतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)