Nagpanchami 2023 : नागपंचमीला तवा, टोकदार वस्तू का वापरत नाही? दूध लाह्याच्या नैवेद्यामागे हे आहे कारण
नागपंचमीचा सण हा हिंदू धर्मामध्ये काही विशेष सणांपैकी एक आहे. काही विशीष्ट नियम पाळले जात असल्याने हा सण आपल्या प्रत्त्येकाच्या लक्षात राहतो. या सणाला पाळल्या जात असलेल्या नियमांमागे काय श्रद्धा आहे ते जाणून घेऊया.
मुंबई : हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात. प्रत्त्येक सणाचे विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या सणांना आजही त्याच उत्साहात आणि भक्ती भावाने साजरे केले जाते. सध्या अधिकमास सुरू आहे. अधिक महिन्यामुळे यंदा श्रावण महिना हा दोन महिन्यांचा आहे. व्रत वैकल्य आणि सणासुदीच्या या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येतात. नागपंचमी (Nagpanchami 2023) हा त्या पैकीच एक महत्त्वाचा सण आहे. या सणाचे ग्रामीण भागात विशेष महत्त्व आहे. यंदा 21 ऑगस्ट 2023 ला नागपंचमी साजरी होणार आहे. नागपंचमीचा सण काही विशिष्ट नियम पाळल्या जात असल्याने विशेष लक्षात राहतो. या नियमांमागे नेमका अर्थ आहे आणि हा सण कसा साजरा करावा त्याबद्दल जाणून घेऊया.
नागपंचमीचे महत्त्व
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात पौराणिक काळापासून सापांना देवांप्रमाणे पुजले जाते. हा सण साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत त्यापैकीच एक आपण जाणून घेऊया. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू लोकं नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
दूध लाह्या हे सापाचे अन्न नाही तरीही या सणाला याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागाला दूध लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. पावसाळ्याच्या दिवसात हा सण साजरा केला जातो. या काळात पचण शक्ती मंदावलेली असते. अशा मौसमात हलका आहार घ्यावा हे सुचीत करण्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो. तसेच उकडलेले अन्न खाल्ल्याने पाचनशक्ती सुधारते त्यामुळे या दिवशी तवा आणि कढई न वापरण्याची परंपरा आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)