Navratri 2023 : दुःखापासून मुक्ती देणारी स्कंदमाता, खंडोबाचा प्रिय पिवळा भंडारा
एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण आल्यास दुःखापासून मुक्ती मिळते. महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची प्रिय वस्तू म्हणजे भंडारा. श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय असा हा पिवळा रंग, तेजोमय ज्योतीचा रंग
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : स्कंदमाता हे दुर्गेचे पाचवे रूप आहे. भगवान स्कंद यांची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चार भुजाधारी आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. कमळाच्या आसनावर विराजमान असल्यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. हिचे वाहन सिंह आहे. स्कंदमातेच्या उपासना केल्यास भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच परम शांती आणि सुखाचा त्याला अनुभव मिळतो. स्कंदमातेच्या उपासनेमुळे भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते.
सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्याने तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते. यावेळी साधकाची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होते. एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण आल्यास दुःखापासून मुक्ती मिळते. नवरात्रीचा पाचवा दिवस हा पिवळ्या रंगाचा आहे.
श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय असा हा रंग. सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जाणारा हा रंग. वैष्णव मंदिरात वसंत पंचमीनंतर उन्हाळा संपेपर्यंत देवांना पिवळी वस्त्रं नेसवण्याची प्रथा आहे. पिवळा गंध, पिवळी फुलं वाहतात. मंगलकार्यात शुभ मानला जाणारा रंग. म्हणूनच शुभकार्यात हळदकुंकू अनिवार्य असते.
महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाची प्रिय वस्तू म्हणजे भंडारा. तो ही पिवळाच. वधूवरांच्या विवाह कंकणात हळड बांधतात. हळद लावणं आणि हळद खेळणं हा एक गोड सोहळा. वलयाचा, प्रकाशाचा, सळसळत्या उत्साहाचा हा रंग.
तेजोमय ज्योतीचा रंग. तेजोवलय म्हंटलय म्हणून हा विषय, अगदी थोर स्त्रियांच्या पुरताचं आहे असं नाही तर अगदी आपआपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांना हे लागू आहे. पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्त्री जेवढी जास्त कणखर तेवढं तिला मनुष्यत्व नाकारलं जातं. जणू तिच्या कणखर असण्याची पुरेपूर किंमत हा समाज तिला देत असतो. लग्नातली हळद उतरून जाते पण या पिवळ्या रंगाचं देणं तिला आयुष्यभर द्यावं लागतं. स्त्रीला आपण एकतर हलका दर्जा देतो नाही तर एकदम देवित्व बहाल करतो. पण, तिने शेजारून बरोबरीने कधी चालावं?
रश्मी पांढरे ( लेखिका निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)