Navratri 2023 : अर्थ, धर्म, काम आणि मोक्षची प्राप्ती करून देणारी दुर्गेचं आगळं वेगळं हिरवं रुप माता कात्यायनी
जगभरात सुरक्षिततेसाठी प्रमाण मानला गेलेला हा गती दर्शक आहे. म्हणूनच सिग्नलमध्ये पुढे जा असे सांगणारा हिरवा. स्त्रियांच्या भावविश्वात याला विशेष स्थान आहे. हिरवा चुडा, डोहाळ जेवणाची हिरवी साडी आणि जीवनातल्या प्रत्येक मंगल प्रसंगाशी निगडीत असा हा हिरवा रंग.
मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : कात्यायनी या नावाने दुर्गेचे सहावे रूप ओळखले जाते. कात्यायनी अमाप फलदायक आहे. ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात ती प्रतिष्ठित आहे. या देवीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. चार भुजाधरी असून अभयमुद्रा आणि वरमुद्रा तिच्या उजव्या हातामध्ये आहेत. तर डाव्या हातामध्ये तलवार आणि कमळाचे फूल आहे. या देवीच्या उपासनेने अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष याची प्राप्ती सहजतेने होते. इहलोकात राहूनही अलौकीक तेज प्राप्त होते. जो व्यक्ती कात्यायनी मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो.
दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची उपासना करतात. या दिवशी साधकाचे मन आज्ञा चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या चक्राला विशेष स्थान आहे. तर नवरात्रीचा सहावा दिवस हा हिरवा रंगाचा मानला जातो. डोळ्यांना सुखावणारा. सृजनाचं, नवोन्मेशाचं, समृद्धीचं प्रतिक असणारा हा रंग.
शांतता आणि संतुलितपणाचा संगम
आयुष्याच्या अस्तित्वाचा रंग म्हणजे हिरवा. निसर्गात सर्वाधिक आढळणारा. या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे पहिल्याने डोळ्यातील वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. निसर्गाचा रंग असल्यामुळेच शांतता आणि संतुलितपणाचा संगम यात पाहायला मिळतो. नव निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा हा रंग. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा दिसून येतात. मनाला प्रसन्न करणारा. शुभकार्याची सुरुवात करणारा, आणि वृद्धीचे प्रतीक म्हणून हा रंग वापरला जातो.
संरक्षण करण्याचा वसा घेतलेल्या स्त्री शेतकरी
ज्यांच्या आयुष्याशी सगळ्यात जास्त निगडीत आहे ते म्हणजे शेतकरी. हरित क्रांती या शब्दांतच समृद्धीची जादू आहे. क्रांती घडवणारा शेतकरी. असे रोजचं जीवन एक संग्राम असणाऱ्या स्त्रिया आणि शेतकरी यांना समर्पित असा हा हिरवा. आपल्यापासून कोसो दूर, न थकता, न हरता रोज नव्याने आयुष्याला सामोऱ्या जाणाऱ्या रणचंडिका, देशी वाणांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचा वसा घेतलेल्या स्त्री शेतकरी यांना हा हिरवा समर्पित. दुर्गेचं हे एक आगळे हिरवे रुप स्त्री शक्तीचा जागर करताना या हिरव्या रुपाचीही आठवण ठेऊ या.