Navratri 2023 : रूप भयकारी पण शुभ फळ देणारी माता कालरात्री, जाणून घ्या कालरात्री देवीचे महात्म्य
देवी दुर्गेचे सातवे रूप म्हणजेच कालरात्री. नवरात्रीच्या सातव्या दिवशी साधकाचे मन सहार चक्रात स्थिर झालेले असते. हिचे दुसरे नाव शुभंकारी असेही आहे. नवरात्रीचा सातव्या दिवशी ग्रे म्हणजेच राखाडी किंवा करडा रंगाचे वस्त्र परिधान करतात.
मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : देवी दुर्गेचे सातवे रूप म्हणजेच कालरात्री. या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटले तर गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. कालरात्री महादेव प्रमाणेच तीन डोळे आहेत. हे ब्रह्मांडासारखे गोल आणि चमकदार आहेत. गाढव हे कालरात्री देवींचे वाहन आहे. चार भूजाधारी कालरात्री हिच्या उजव्या हातामध्ये वरमुद्रा आणि खाली अभयमुद्रा आहेत. तर दाव्ह्या हातात लोखंडाचा काटा आणि खड्ग आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी साधकाचे मन सहार चक्रात स्थिर झालेले असते. यामुळे ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिचे दरवाजे उघडतात.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासातून आगीच्या भयंकर ज्वाला निघतात. हिचे रूप दिसायला अत्यंत भयकारी असले तरी ती नेहमी शुभ फळ देणारी आहे. म्हणून हिचे दुसरे नाव शुभंकारी असेही आहे. दुष्टांचा विनाश करणारी, ग्रह संकटांनाही दूर करणारी अशी ही कालरात्री. राक्षस, भूतप्रेत हिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी शुभंकारी आहे. त्यामुळे हिची उपासना केल्यास मिळणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही.
नवरात्रीचा सातव्या दिवशी ग्रे म्हणजेच राखाडी किंवा करडा रंगाचे वस्त्र परिधान करतात. परिपक्वतेचा हा रंग आहे. मानवी मेंदूचा हा रंग आहे. काही बुद्धीमान स्त्रिया ज्यांनी हा समाज घडवला त्यांना आजचा रंग समर्पित. प्रत्येक काळात अनेक स्त्रियांनी त्या त्या वेळची समाजबंधने झुगारली. काळाच्या पाटीवर आपले नाव कोरले.
सुशिक्षित, बुद्धिवान, चांगले कमावणार्या अनेक स्त्रिया जगात आहेत. पण, त्यांनाच जास्त टीकेला तोंड द्यावे लागले. मात्र त्या डगमगल्या नाहीत. उलट आपल्यावर होणारी टीका ही त्यांनी मनाला लावून घेतली. त्यातुनच त्यांचे कर्तुत्व जगासमोर झळकले. शिक्षणाच्या संधीमुळे अनेक स्त्रिया उच्चपदावर पोहोचल्या.
कुटुंबाने, समाजाने त्यान समजून घेतले. मदतीचा हात दिला. तर, त्यांनीही ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, क्षमता आणि वैविध्य वापरले. देशाच्या प्रगतीत मोलाची भर घातली. कुटुंबाने, संस्थेने, समाजाने काही गोष्टी समजून घेतल्या तर योग्य संधी निर्माण करता येते याचा त्यांनी आदर्श घालून दिला. या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करत, संशोधनाच्या वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा!