Nirjala Ekadashi 2023 : सर्वात कठीण असते निर्जला एकादशी व्रत, पुजेचा विधी आणि मुहूर्त
निर्जला एकादशीचे व्रत पापमुक्तीसाठी केले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि सुख प्राप्त होते. पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते.
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. या एकादशीपैकी एक म्हणजे निर्जला एकादशी. मान्यतेनुसार निर्जला एकादशीला सर्वात कठीण एकादशी म्हणतात. निर्जला एकादशीच्या (Nirjala Ekadashi 2023) उपवासात पाणीही पीत नाहीत, त्यामुळे या एकादशीचे नाव निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच दानधर्म करणे शुभ मानले जाते. निर्जला एकादशीचे व्रत करणार्या भाविकांना पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच फळ मिळते, असे मानले जाते. जाणून घ्या मे महिन्यात निर्जला एकादशी कधी साजरी होईल आणि कोणत्या वेळेत पूजा करता येईल.
निर्जला एकादशी व्रत 2023
निर्जला एकादशीचे व्रत पापमुक्तीसाठी केले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि सुख प्राप्त होते. पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. 30 मे रोजी एकादशी तिथी दुपारी 1.07 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 मे, बुधवारी दुपारी 1.45 वाजता समाप्त होईल. यामुळे 31 मे, बुधवारी निर्जला एकादशी साजरी करण्यात येणार असून बुधवारीच निर्जला एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. 1 जून, गुरुवार रोजी निर्जला एकादशी व्रत साजरे केले जाणार आहे. व्रत पारणाचा शुभ मुहूर्त पहाटे 5.24 ते 8.18 पर्यंत मानला जातो.
निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व
या एकादशी व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, चपला, छत्री, पंखे आणि फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणार्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशींच्या पुण्याचं लाभ मिळतं. असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो, त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते.
निर्जला एकादशीचे पौराणिक महत्त्व
निर्जला म्हणजे जलविना केलेली उपासना आणि म्हणूनच निर्जलचे व्रत थोडेसे कठीण असले तरी सर्वात जास्त फळ देणारे असते. महाभारतात महाशक्तीशाली अशा भीमाला उपवास करणे हे अशक्यप्राय गोष्ट होती. एकदा महर्षी व्यास यांनी भीमाला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. आपल्याला भूक सहन होत नसल्याने आपण वर्षातील 24 एकादशी कशी करणार असा प्रश्न केल्यावर महर्षींनी भीमाला निर्जला एकादशीचे व्रत करताना संपूर्ण एकादशीचा दिवस जलाविना उपवास केल्यास तुला 24 एकादशीचे फळ प्राप्त होईल असे सांगितल्याचे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.
एकादशी म्हणजे एक दिवसाचे लंघन, शरीर सत्रात देखील अशा लंघनाचे महत्व सांगताना उपवासामुळे शरीरचक्र व्यवस्थित काम करते असे सांगण्यात आले आहे. खरे तर उप-वास या शब्दाची फोड करताना उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे होय. देवाच्या जवळ चिंतनात राहणे म्हणजे उपवास अशी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे. माणूस अखंड चिंता करीत राहतो मात्र एकादशीचा एक दिवस चिंतन केल्यास सर्व चिंतांचे हरण होते. निर्जला एकादशी म्हणजे भगवंताचे चिंतन करण्याचा दिवस.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)