पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसाठी दिवे घाट (Dive Ghat) सर केला. माऊलीची पालखी जेजुरी मार्गे पंढरपूकडे (Pandharpur wari 2022) मार्गस्थ होत आहे. पुणे ते सासवड दरम्यान दिवे घाटाचा अवघड घाट चालून काल सासवड येथे पालखीने मुक्काम केला. तर तुकोबांच्या पालखीने (Tukoba Palkhi) लोणीकाळभोरसाठी प्रस्थान ठेवले.
पुण्यातून सकाळी सहा वाजता माऊलींची पालखीने प्रस्थान ठेवले त्यानंतर सकाळी आठ वाजता शिंदे छत्रीला आरती झाली. साधारणतः दहा ते साडे दहाच्या दरम्यान पालखी हडपसरला पोहोचली. हडपसरपर्यंत पुणेकर माऊलींच्या पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी झाली होती. काल योगिनी एकादशी होती, त्यामुळे याच हडपसर मार्गावरती पुणेकरांनी वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे दरवर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात. या वर्षीसुद्धा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत वडकी ते दिवे घाट पायी वारी केली.
वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पुण्यामधले तरुण-तरुणी अनेक नोकरदार आणि गृहिणीसुद्धा दिवेघाटात साडेचार किलोमीटर अंतर चालत असतात. सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 ते 28 जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 24 जून ते 5 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे,
सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – 26 आणि 27 जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.
वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- 27 जून रोजी रात्री 11 वाजता ते 28 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- 25 ते 28 जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- 25 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.
यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- 26 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.