घुंगराचा छनछनाट, टाळ मृदुंगाचा नाद. लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाप. अशा भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदीचा अवीट नमुना अनुभवायला मिळाला. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पालखी सोहळा (Pandharpur wari 2022) होत. असताना लावणीनृत्यातून वारकऱ्यांची अनोखी सेवा या माध्यमातून केली जाते. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तीकानी आपली कला सादर केली. कोरोना काळात पालखी सोहळा निघाला नव्हता. मात्र यावर्षी पूर्ववत वारीचा सोहळा पार पडतोय. त्यामुळं या कला केंद्रातील कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या तीस वर्षांपासून कला केंद्राच्या माध्यमातून अन्नदान आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. या केंद्रात जवळपास 200 कलावंत या सेवेत सहभाग होतायत. लावणी आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून वारकऱ्यांना मनोरंजनासह त्यांचा थकवा घालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज तुकाराम महाराजांची पालखी आपल्या गावात येणार या पालखी सोहळ्यातील वारकरी आपल्या दारातून जाणार या भावनेतून गावकरी सकाळपासूनच स्वागतासाठी सज्ज झालेले असतात. घरासमोर रांगोळी काढली जाते. सडा टाकला जातो. सनई चौघडे लावून या वारकऱ्यांचा वाजत गाजत स्वागत केले जाते. आजच्या दिवशी या पालखी मार्गातील गावांमध्ये घराघरांत सणाचे वातावरण पाहायला मिळते. घरासमोर गावकरीसुद्धा या वारीमध्ये असे काही दंग होतात की महिला सुद्धा फुगडी धरतात. लहान मुलांचा देखील पालखी सोहळ्यातील उत्साह पाहण्यासारखा असतो.
दोन वर्षे कोरोनामुळ बंद असलेली आषाढी वारी सध्या राज्यात मोठ्या उत्साहात पार पडताना दिसत आहे. लाखो वारकऱ्यांची गर्दी आणि विठूनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे पुणे शहरात आगमन होते. यावेळी अनेक मराठी कलाकारही वारीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचाही असाच वारंकऱ्यांच्या गर्दीतील एक व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून प्राजकताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्राजकता नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेत वारकऱ्यांसोबत विठूनामाच्या भक्तीत लीन झालेली दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने टाळ मृदंगाच्या गजरात ठेका धरल्याचेही दिसत आहे. प्राजक्ताच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे.