भक्ती, शक्ती, आस्थेचा महाउत्सव… त्रिवेणी संगमावर समरसता; महाकुंभाचं महापर्व जाणून समजून घ्या
प्रयागराज येथील कुंभमेळा हा श्रद्धा आणि एकतेचा महा उत्सव आहे. संत, साधू आणि लाखो भाविकांचा हा संगम अध्यात्माचे प्रचंड केंद्र आहे. कुंभमेळ्यातील विरोधाभास, संतांचे तप आणि राजकारणाचे मिश्रण यावर प्रकाश टाकले आहे. हा लेख कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच त्यातील सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही चर्चा करतो.
प्रयागराज येथे उद्यापासून महाकुंभाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षातील हा पहिला महाकुंभ असणार आहे. त्यानंतर पुन्हा 12 वर्षानंतर महाकुंभ येईल. कुंभ म्हणजे समरसतेचा उत्सव आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठं लोक पर्व आहे. आस्थेची त्रिवेणी आहे. संवादाचा मोठा मंच आहे. अध्यात्मिक ऊर्जेचं मोठं केंद्र आहे. अध्यात्माचा एवढा मोठा उरुस भारतात दुसरा भरत नाही. त्यामुळेच या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असतं. देशातीलच नव्हे तर विदेशातूनही लोक महाकुंभ पाहायला येतात. काही तर केवळ महाकुंभ पाहण्यासाठी येतात. पण जात नाहीत. कारण वैराग्य आल्याने तेही साधू बनतात. संसाराचा त्याग करतात. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी मास कम्युनिकेशनचं काम महाकुंभमधून होत असतं.
त्याग, तप, हठ, योगाला सांभाळणारे निर्मोही संत पूर्वी प्रजा आणि राजाला सल्ला द्यायचे. राज्यसत्तेने आपल्या मस्तीत राहू नये आणि समाजाने स्वार्थ पाहू नये, असा सल्ला या संत महंतांकडून दिला जायचा. तसेच कोणत्या गोष्टींची चिंता करण्याची गरज आहे, हेही सांगितलं जायचं. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक कुंभला यायचे. स्नान, ज्ञान, व्रत, त्याग आणि सत्संगाचा लाभ घ्यायचे. कुंभात भारतीय समाज आपल्या विभिन्न संस्कृती, कला, संसाधन आणि शिस्तीचं प्रदर्शन घडवायचे.
कुंभमेळ्यात जसे गोरगरीब येतात, संत महंत येतात तसेच व्यापारी आणि मोठे राजेही यायचे. कुंभात कोणताही भेदभाव नसतो. कोणीच गरीब नसतो. कोणीच श्रीमंत नसतो. कोणी राजा नसतो तर कोणी रंकही नसतो. सर्वच असतात श्रद्धाळू. सर्वच असतात धर्मावर प्रेम करणारी माणसं. मोक्ष प्राप्तीसाठी आणि पुण्य मिळवण्यासाठी आलेली माणसं. कोणी मोठा असो की छोटा असो, तो या मेळ्यात पदर पसरतो, हात जोडतो आणि पुण्य मिळण्याची याचना करत असतो.
विरोधाभासी कुंभ
अमरत्व मिळवण्यासाठी लोक चहूबाजूने कुंभच्या दिशेने येत आहेत. समुद्र मंथनातून जे अमृत आलं, ते प्रयागराजमध्ये सांडलं. त्याच अमृताच्या शोधासाठी साधू, संत, महंत, बैरागी, बाबा, योगी, आचार्य, महामंडलेश्वरयेत असतात. शोधाची ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली. अजूनही ती सुरूच आहे. ती यापुढेही सुरूच राहील. त्यामुळेच सर्वच कुंभकडे कूच करत आहेत. ज्यांनी घर सोडलं, समाज सोडला, सत्ता सोडली, राजपद सोडलं, साधू झाले, बैरागी झाले, त्यांनाही अमृताची लालसा आहे. अमरत्वाची प्रबळ इच्छा आहे. त्यामुळेचा हा कुंभ मोठा विरोधाभासी असतो. आपल्या सनातनमध्ये हाव, इच्छा, लालसेच्या पुढे संतत्व आहे. संत परिग्रहहीन आहे. गृहहीन आहेत. त्यांनी सर्व काही त्यागलं आहे. माणूस म्हणून मृत्यू पावलेल्या लोकांचा हा समूदाय आहे. फक्त देह रुपाने ते वावरत आहेत. आपलं पिंडदान स्वत: करून त्यांनी संसाराला राम राम केला आहे. ते संत झाले आहेत.
संत काहीच मिळवत नाही. केवळ मानवी मनाची पीडा ते बघतात. एका जागी राहत नाहीत. सर्व विश्वच त्यांचं आहे. प्रत्येक चराचरात ते असतात. त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही, घर नाही, दार नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, कपडालत्ता नाही आणि सौंदर्याची हाव नाही. सर्व मोहमायेपासून ते दूर आहेत. त्यांना फक्त एकाच गोष्टीची हाव आहे. ती म्हणजे एकांताची. एकांतही आपल्या प्रभूची साधना करण्यासाठी. प्रभूच्या समाधीत तल्लीन होण्याची. त्यांना फक्त मोक्ष हवाय. त्यासाठी त्यांनी सर्व काही त्यागलं आहे. अमृताची ओढ तर देवतांसह राक्षसांमध्येही आहे. मानव आणि दानव दोघेही अमृतासाठी हपापलेले आहेत. पण संत या दोघांपेक्षा मोठे आहेत. कारण संतांचं लक्ष अमृत नाहीये. कारण संतत्व हेच अमरत्व आहे. मग ही कसली मरीचिका? जी संताला मानव बनवत आहे. असा मनुष्य जो मायेचा दास आहे. मोहाने पछाडलेले आहेत. इच्छेच्या घोड्यांवर स्वार होऊन विजयासाठी व्याकूळ आहेत.
समरसतेचं महापर्व
महाकुंभ देशाच्या समरसतेचा महापर्व आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय, कोणत्याही आवाहनाशिवाय कोणत्याही सरकारी आदेशाशिवाय आणि सर्व जाती, धर्म, वर्ग आणि संप्रदायाचे लोक लाखोंच्या संख्येने येत असतात. या ठिकाणी वैर नसतं, कटुता नसते आणि दुजाभावाची भावनाही नसते. वेगळेपणाची भावना तर दूर दूर पर्यंत मनाला शिवत नाही. महाकुंभ बाबांचे वैभव, आखाड्यांचे ऐश्वर्य आणि भक्तांच्या विलासाचं साधन बनता कामा नये. आस्थेच्या या कुंभमध्ये दीड लाख कॉटेज मिळत असल्याचं सांगितलं जात आहे.
संतांचं सत्तेशी घेणंदेणं असू नये. त्यांनी सत्ता आणि समाज सोडला आहे. पण तरीही कुंभमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राजकीय चर्चा का होत असते? विशेष म्हणजे संतच ही चर्चा का घडवून आणतात? संत राजकीय प्रस्ताव मंजूर करू इच्छितात. सत्ता आणि संतत्व हे सनातनचे दोन टोक आहेत. पण या कुंभात संत सत्तेचा जुगाड करताना दिसत आहेत. त्यामुळेच कुंभचा अर्थ अदृश्य होतोय की काय असं वाटत आहे. संगमाच्या त्रिवेणीत सरस्वती लुप्त आहे. पण कुंभच्या आयोजनात जे काही होत आहे, ते पाहून असं वाटतं संपूर्ण वातावरणातून सरस्वती लुप्त झाली आहे.
हा कुंभमेळा आहे, तमाशा नाही
कुंभाचा भाव आहे समागम. देशभरातील अखाडे, पीठ, मत, संप्रदाय, शंकराचार्य या ठिकाणी जमा होतात. वेगवेगळ्या संप्रदायांचे विचार वेगवेगळे असले तरी संवाद होतो. इथे लोक एका विशिष्ट देवतेची स्तुती करण्यासाठी नाही, तर त्यांच्या विस्तारासाठी, चित्ताच्या विस्तारासाठी, ज्ञानाच्या विस्तारासाठी, विराट दर्शनासाठी जमा होतात. कारण प्रयाग म्हणजे संगम. एकत्र येण्याची भावना. भावनांची आणि धारांची एकत्र येण्याची भावना. माणसामाणसाच्या जोडणीची भावना. ही भावना नसेल तर कुंभ यशस्वी होत नाही.
प्रयागच्या त्रिवेणी संगमामध्ये कुंभाच्या दरम्यान केवळ नदीच नव्हे तर करोडो लोकांची आस्था देखील वाहते. ही आस्था कुंभाचा अमृततत्त्व आहे. जनआस्थेचा हा महाकुंभच समाज चालवतो. महिनाभर चालणाऱ्या या महाकुंभात जे करोडो लोक येतात, त्यांना कोणी निमंत्रण देत नाही. न कुठे जाहिरात, न कोणी विशेष आवाहन, न मोफत अन्न, न राहण्याची व्यवस्था. तरीही अनेक शतकांपासून भारताची बहुलता असाच इथे येत आहे. आजकाल सरकारे मात्र स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी जाहिराती पाठवून, निमंत्रण देऊन “पिसान पोत भंडारी” बनण्याचा प्रयत्न करतात. अनंत काळापासून कोणत्याही आवाहनाशिवाय आपल्या संस्कृतीचा हा सर्वात मोठा जमाव संगम तटावर होत आहे. विविध अडचणी पार करत, बंधनांचं गाठोडं डोक्यावर घेऊन जे सामान्य लोक इथे येतात, त्यांना तीच श्रद्धा इथे आणते जी श्रद्धा आणि निष्ठा या देशाला चालवते. जे लोक कुंभाला फक्त एक धार्मिक उत्सव मानतात, त्यांना न त्याचा धार्मिक अर्थ समजतो, न लौकिक.
प्रयागमध्ये त्रिवेणीची सरस्वती एक प्रतीक आहे. तीर्थ करणाऱ्या भाविकांची आस्था. प्रश्न असा आहे की, सरस्वती नदी कधी प्रयागमध्ये होती का? तिचं अस्तित्व आज विज्ञानाने सिद्ध केलं आहे, पण प्रयागमध्ये नाही. मानसरोवरातून निघून ती नदी कच्छच्या रणापर्यंत पोहोचते. मग प्रयागमध्ये तिचा प्रवाह कसा? ती इथे कधी स्वतंत्र जलधारेसारखी वाहत नव्हती. इथे सरस्वती कधी वेगळी नदी नव्हती, ती लोकांच्या रूपात होती. कुंभाच्या वेळी, जनसमुद्राच्या रूपात ती इथे वाहते.
पुढील कुंभापासून अक्षयवटाचे दर्शनही सुरू झाले आहे. अकबराने बांधलेल्या किल्ल्यात यमुनेच्या काठी हे अक्षयवट बंद होते. अक्षयवट प्रलयातही नष्ट होत नाही. त्यावर विष्णूचा वास आहे. स्वतः भगवान शिवाने ते प्रयागमध्ये लावले होते, असं सांगितलं जातं. वनवासाच्या वेळी राम, लक्ष्मण आणि सीतेने त्याचे दर्शन घेतले होते. तुलसीदास असेच लिहितात. नंतर हा किल्ला सैन्याचा शस्त्रागार बनला आणि अक्षयवटावरून साधू-संत मोक्षासाठी आत्महत्या करायला लागले. आत्महत्या करणारा पॉइंट बनल्यानंतर हा वट किल्ल्यात बंद केला गेला आणि सामान्य लोकांची त्याला पोहोच नाही. या वेळच्या कुंभाच्या आयोजनानंतर तो वट आता खुला आहे.
प्रत्येक 144 वर्षानंतर एक महाकुंभ
कुंभाची पहिली लिखीत माहिती प्रसिद्ध चीन प्रवासी आणि महान बौद्ध दार्शनिक ह्वेनसांग दिलेली आहे. ह्वेनसांग यांनी त्यांच्या साहित्यात कुंभचा उल्लेख केला आहे. प्रत्येक 12 वर्षानंतर येणाऱ्या कुंभाला पूर्ण कुंभ म्हणतात. अर्ध कुंभ दर सहा वर्षाने येतं. पण अर्ध कुंभ केवळ प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतं. 12 पूर्ण कुंभानंतर म्हणजे 144 वर्षानंतर एक महाकुंभ येत असतो. महाकुंभाचं आयोजन फक्त प्रयागराजमध्येच होतं.
2000 जुना उत्सव
कुंभमेळ्याच्या सर्वात जुन्ह्या लिखित माहितीनुसार, हा उत्सव सुमारे 2000 वर्षांचा आहे. 590 मध्ये जन्मलेले हर्षवर्धन 606 ते 647 इसवी दरम्यान राज्य करत होते. ते दर पाच वर्षांनी प्रयागराजमध्ये धर्मसभा आयोजित करत. ते कुंभाच्या माध्यमातूनच आपलं राज्य चालवत होते. कुंभाच्या दरम्यान, राजा हर्षवर्धन दान देण्यासाठी दोन प्रकारे कार्य करत होते. एक म्हणजे, ते दान सोहळे आयोजित करून दान देत, आणि दुसरं म्हणजे, ते आपली आय मिळकत चार समान भागांत विभागत – शाही कुटुंबासाठी, सैन्य/प्रशासनासाठी, धर्माच्या नामावर, आणि गरीबांसाठी. काही संदर्भ तिबेटमधून देखील कुंभ मेळ्याच्या आयोजनाचे मिळतात. कामा मॅकलेन यांच्या Pilgrimage and Power या पुस्तकात या बाबतीत उल्लेख आहे. या पुस्तकात 1765 ते 1954 दरम्यान तिबेटमधील कुंभमेळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिला शाही स्नान कधी?
यंदाचे शाही स्नान पौष पौर्णिमेला होणार आहे. पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार 13 जानेवारी रोजी पहाटे 05: 03 मिनिटांनी सुरू होईल. ही पौर्णिमा 14 जानेवारी रोजी 3: 56 मिनिटांनी संपेल, असं वैदिक कॅलेंडर सांगते.
यंदाचे शाही स्नान कधी?
मकर संक्रांत – 14 जानेवारी 2025
मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025