Sarva Pitru Amawasya 2022: आज सर्व पितृ अमावस्या, पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
आज सर्व पितृ अमावस्या आहे. आजच्या दिवशी पितरांचे स्मरण करून अन्नदान करण्याची प्रथा आहे. या निमित्याने आजच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
मुंबई, आज सर्व पितृ अमावस्या (Sarv Pitru Amavasya) आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी पृथ्वीवर अवतरलेल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना निरोप दिला जातो. जर या वर्षी तुम्ही पितृ पक्षात तुमच्या पूर्वजांचे स्मरण केले नसेल, तर आज त्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. सर्वपित्री अमावस्येला त्यांचे स्मरण करून, गाईला जेवणाचे पान लावल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी दान केल्याचे फळ अतुलनीय आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.
सर्वपित्री अमावस्येला पितरांना असा द्या निरोप
ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. आंघोळ करून शुद्ध आचरणाने अन्न तयार करा. अन्न सात्विक असावे आणि त्यात खीर असावी. पितरांच्या फोटोला हार घालावा. त्यांची पूजा करावी व घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा. त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.
- फक्त या पितरांचे श्राद्ध करा- सर्वपित्री अमावस्येला, ज्या पितरांची मृत्यू तारीख विसरली गेली आहे किंवा अमावस्या तिथीला त्यांचे निधन झाले आहे. अन्यथा, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध त्यांच्या मृत्युतिथीनुसार करणे योग्य आहे.
- नखे आणि केस कापणे टाळा – सर्वपितृ अमावश्येच्या दिवशी केस, नखं इत्यादी कापू नका. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू नये.
- दारातून कोणाला रिकाम्या हाताने पाठवू नये- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणी तुमच्या दारात दान आणि दक्षिणा घेण्यासाठी येत असेल तर त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. आपल्या क्षमतेनुसार दान करावे. या दिवशी पीठ, तांदूळ किंवा तीळ दान करणे खूप शुभ मानले जाते.
- काय खावे आणि काय खाऊ नये- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अंडी, मांस, मासे किंवा अल्कोहोलचे सेवन टाळावे. याशिवाय लसूण, कांदा इत्यादी तामसी पदार्थ खाणेही टाळावे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)