धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Temple Fraud) एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देवीच्या सोन्याच्या मुकूटासह इतर दागिने गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. मंदीर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे तुळजाभवानी संस्थान हे कायमच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ड्रेसकोड तर कधी सशुल्क दर्शन अशा मुद्यांवरून मंदिर प्रशासनाला नेकमीच टिकेचे धनी व्हावे लागते. आता मात्र थेट सोन्याचे दागिनेच गहाळ झाल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिरात लाखो भाविक देशभरातून दर्शनासाठी येतात. अनेकांची कुलदेवी असल्याने भाविक देवीला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर अनेक भक्त श्रद्धेने कबुल केल्याप्रमाणे सोन्याचे दागीने आणि वस्तू देवीच्या चरणी अर्पण करतात. हे दागीणे मंदिर संस्थान नोंदणी करून सुरक्षीत ठेवते. या शिवाय देवीच्या अलंकारांचीसुद्ध जबाबदारी मंदिर प्रशासनाकडे आहे, मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्रावर देखील डल्ला मारण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे 826 ग्राम म्हणजे पाऊण किलो पेक्षा जास्त वाजनाचा सोन्याचा मुकुट देखील गहाळ आहे. प्रकरण इथवरच थांबले नाही तर चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुट ठेवण्यात आला. पुरातन खडावा (पादुका) काढून त्या नवीन बसविण्याचा पराक्रमही करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा ठिसाळ कारभार या ना त्या कारणाने कायमच चव्हाट्यावर येत असतो मात्र उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर कुपंणचं शेत खातंय का? असा प्रश्न देवीच्या चरणी भरभरून दान देणाऱ्या भाबड्या भाविकां पडतो आहे. यावर मंदिर प्रशासन कारवाई करून खरे चेहरे समोर आणणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागेलेले आहे.