Shravan 2022: दर 12 वर्षांनी पडते मंदिरावर वीज, रहस्यमयी आहे हे शिवमंदिर
स्थानिक लोक या शिवलिंगाला माखन महादेव म्हणतात, तर काही लोक याला बिजली महादेव देखील म्हणतात. भोलेनाथाचे हे शिवलिंग कुल्लूपासून 18 किमी अंतरावर माथन नावाच्या ठिकाणी आहे.
आजपासून श्रावण महिना (Shravan 2022) सुरू झाला आहे. हा महिना भगवान महादेवाचा अत्यंत्य प्रिय महिना आहे. त्यानिमित्याने भगवान महादेवांच्या काही रहस्यमयी मंदिरांबद्दल जाणून घेऊया. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक रहस्यमयी शिवमंदिर आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उकललेले नाही. उंच टेकड्यांवर वसलेल्या या मंदिरात पार्वती, व्यास पार्वती आणि व्यास नदीचा संगमही आहे. दर 12 वर्षांनी या मंदिरावर आकाशातून वीज पडते, परंतु त्यानंतरही मंदिराचे कोणतेही नुकसान होत नाही. जाणून घेऊया शतकानुशतके चालत आलेल्या या रहस्याबद्दल काही रंजक गोष्टी. पौराणिक कथेनुसार येथे एक महाकाय दरी आहे. महादेवाने मारलेल्या नागाच्या रूपात ही दरी असल्याची आख्यायिका आहे. असे म्हटले जाते की, दर 12 वर्षांनी भोलेनाथांच्या परवानगीने भगवान इंद्र या मंदिरावर वीज पाडतात. वीज पडल्याने मंदिरातील शिवलिंग नष्ट होते. यानंतर शिव भक्त तुटलेल्या शिवलिंगावर मलम म्हणून लोणी लावतात, त्यामुळे महादेवाला वेदनांपासून आराम मिळतो अशी मान्यता आहे.
स्थानिक लोक या शिवलिंगाला माखन महादेव म्हणतात, तर काही लोक याला बिजली महादेव देखील म्हणतात. भोलेनाथाचे हे शिवलिंग कुल्लूपासून 18 किमी अंतरावर माथन नावाच्या ठिकाणी आहे.
या मंदिरात कुलांत नावाचा राक्षस राहत होता अशी आख्यायिका आहे. एकदा त्याने सर्व प्राणिमात्रांना मारण्यासाठी व्यास नदीचे पाणी थांबवले. हे पाहून महादेव संतापले. यानंतर महादेवाने भ्रम निर्माण केला. भगवान शिव राक्षसाकडे गेले आणि त्याला सांगितले की त्याच्या शेपटीला आग लागली आहे. महादेवाचे म्हणणे ऐकून राक्षसाने मागे वळून पाहताच शिवाने कुलांतच्या डोक्यावर त्रिशूल मारले आणि तो तेथेच मरण पावला. असे म्हणतात की, राक्षसाचे विशाल शरीर डोंगरात परिवर्तित झाले, ज्याला आज आपण कुल्लू पर्वत म्हणतो.
पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने कुलांतला मारल्यानंतर, दर 12 वर्षांनी इंद्राला तेथे वीज पडण्यास सांगितले. हे करण्यामागचे कारण म्हणजे, जेणेकरून सार्वजनिक हानी होणार नाही. विजेचे धक्के सहन करून भगवान स्वतः भक्तांचे रक्षण करतात अशी मान्यता आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)