आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वतींचे निधन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचा वावर संपूर्ण देशभर होता, ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी या गावातील होते.
त्र्यंबकेश्वर, नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज ( Mahant sagaranand saraswati maharaj) यांचे आज (शनिवार दि. 08) पहाटे निधन झाले होते. त्यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता सेवा संघ त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांना त्र्यंबकेश्वर येथेच समाधी देण्यात आली आहे. आज नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्री स्वामी सागरानंद सरस्वती यांचे अंत्यदर्शन घेतले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत देखील त्यांचा मोठा सहभाग होता
महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचा वावर संपूर्ण देशभर होता, ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देवाची वाडी या गावातील होते.
2003 ते 2015 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात ते अध्यक्ष होते. त्यामुळे साधू – महंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींशी समन्वय घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
संपूर्ण भारतात होणाऱ्या प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यामुळे महंत सागरानंद सरस्वती महाराज सर्वांना परिचित होते.
देशभरात फिरणे असल्याने त्यांचे हजारो भक्त होते. अनेकांनी त्यांच्याकडून दिक्षा देखील घेतली होती. त्यामुळे अध्यात्म क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सागरानंद सरस्वती स्वामीजींनी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिलं आहे.
अध्यात्म क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या स्वामीजींचे भारतभरात मोठा शिष्य परिवार असून त्यांच्या निधनाने भक्त परिवार पोरका झाला आहे.