Solar Eclipse 2023 : वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात दिसणार का?
Solar Eclipse 2023 : पुराणानुसार पहिले सूर्यग्रहण समुद्रमंथनाच्या वेळी झाले. रामायणातील अरण्य कांडातही सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. या दिवशी प्रभू रामाने खार-दुषणाचा वध केला होता. महाभारत काळात, ज्या दिवशी पांडव जुगारात हरले, त्या दिवशी सूर्यग्रहण झाले. त्यानंतर महाभारत युद्धाच्या 14 व्या दिवशी अर्जुनाने जयद्रथाचा वध केला तेव्हा सूर्यग्रहण झाले.
मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) आज होणार आहे. हे सूर्यग्रहण सर्वपितृ अमावस्या (Sarvapitru Amavasya) आणि शनी अमावस्या यांच्या संयोगाने होत आहे. कन्या आणि चित्रा नक्षत्रात सूर्यग्रहण होईल. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. आज हे सूर्यग्रहण किती वाजता होणार हे जाणून घेऊया. ते भारतात दिसेल की नाही आणि त्यात सुतक काळातील नियम लागू होतील की नाही या बद्दलही माहिती घेऊया.
सूर्यग्रहण वेळ
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि रविवार, 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल. म्हणजेच ग्रहणाचा कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. ग्रहण संपताच दुसऱ्या दिवशी सकाळी शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल.
सूर्यग्रहण भारतात दिसणार का?
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. हे सूर्यग्रहणसुद्धा भारतातही दिसले नव्हते.
सूर्यग्रहण कुठे दिसणार?
हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, उत्तर आफ्रिकेचा पश्चिम किनारा, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.
सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध असेल की नाही?
सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. पण सुतक काळ तेव्हाच वैध असतो जेव्हा भारतात सूर्यग्रहण दिसते. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही लागू होणार नाही.
सूर्यग्रहणाची धार्मिक श्रद्धा
पुराणानुसार पहिले सूर्यग्रहण समुद्रमंथनाच्या वेळी झाले. रामायणातील अरण्य कांडातही सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. या दिवशी प्रभू रामाने खार-दुषणाचा वध केला होता. महाभारत काळात, ज्या दिवशी पांडव जुगारात हरले, त्या दिवशी सूर्यग्रहण झाले. त्यानंतर महाभारत युद्धाच्या 14 व्या दिवशी अर्जुनाने जयद्रथाचा वध केला तेव्हा सूर्यग्रहण झाले. कृष्णाची नगरी द्वारकाही सूर्यग्रहणात बुडली होती.
सूर्यग्रहण खबरदारी
सूर्यग्रहण काळात अन्न घेणे टाळावे. गरोदर महिलांनी किंवा वृद्धांनी घराबाहेर पडणे टाळावे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने असे कोणतेही बंधन असणार नाही. ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर शक्य असल्यास आंघोळ करा किंवा हात पाय धुवा आणि काहीतरी दान करण्याचा संकल्प करा. दुसऱ्या दिवशी सकाळी, एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला ठरवलेले दान करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)