शनि शिंगणापूर येथील शनी मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आज पासून भाविकांसाठी खुला
अडीचशे मीटरचा हा भुयारी मार्ग असून भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारावर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरील गर्दी कमी होणार आहे. पानस नदी सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत शनी मंदिराच्या समोरील बाजूस 55 कोटीची विकास कामे सुरू आहेत.
कुणाल जायकर अहमदनगर : अहमदनगरला शनि शिंगणापूर (Shani Shingnapur) येथील शनी मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आज पासून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. अडीचशे मीटरचा हा भुयारी मार्ग असून भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारावर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरील गर्दी कमी होणार आहे. पानस नदी सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत शनी मंदिराच्या समोरील बाजूस 55 कोटीची विकास कामे सुरू आहेत. यातच हा भुयारी मार्ग असून या मार्गामुळे भाविकांना वाहनताळातून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सरळ पोहोचता येणार आहे. मागील दहा वर्षापासून ही विकास कामे सुरू असून आता पूर्णत्वाकडे जात आहेत. शनी मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला झाल्याने सुविधा निर्माण झाली आहे.
शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली का?
धार्मिक कथेनुसार, एकदा भीषण पुरामुळे संपूर्ण शिंगणापूर गाव बुडण्याच्या मार्गावर होते. त्यादरम्यान, लोकांना पाण्यात एक विचित्र दगड तरंगताना दिसला, जेव्हा पाणी कमी झाले तेव्हा एका मेंढपाळाला तोच दगड एका झाडावर दिसला. तो खाली घेऊन तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून रक्त येऊ लागले. मेंढपाळ घाबरला. रात्रीच्या वेळी शनिदेव मेंढपाळाच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी त्या दगडाला अभिषेक करण्यास सांगितले. शनिदेव म्हणाले की, मंदिरात छताची गरज नाही. संपूर्ण आकाश माझे छत आहे. यामुळेच छायापुत्राच्या मंदिराला छत नाही.
शनि शिंगणापुरात घराचे दरवाजे उघडे राहतात
शनी शिंगणापूर मंदिरात पुजारी नाही, झाडे आहेत पण सावली नाही, घरे आहेत पण दरवाजे नाहीत. असे म्हणतात की येथे कधीही चोरी होत नाही आणि कोणी चोरी केली तर त्याला गावाची हद्द ओलांडता येत नाही, त्याला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो, त्याचे जीवन नरकापेक्षाही भयंकर होते. येथे लोक न कुठलीही भीती न बाळगता सोने, दागिने इत्यादी मौल्यवान वस्तू घरात उघड्यावर ठेवतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)