मंगळवारच्या दिवशी चुकूनही करू नये या गोष्टी, होतात नकारात्मक परिणाम
मंगळवार हा हनुमान आणि मंगळाचा दिवस मानला जातो. मंगळ (Mangalwar Upay) हा उग्र मानला जात असल्याने या दिवशी मंगळ शांत करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते.
मुंबई : सनातन धर्मात आठवड्यातील सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेच्या उपासनेचे दिवस मानले गेले आहेत. ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळवार हा हनुमान आणि मंगळाचा दिवस मानला जातो. मंगळ (Mangalwar Upay) हा उग्र मानला जात असल्याने या दिवशी मंगळ शांत करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते. यासोबतच अशी अनेक कामे आहेत, जी या दिवशी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आज आपण अशाच 5 कामांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मंगळवारी चुकूनही करू नये, अन्यथा तुमच्या आयुष्यात उलथापालथ व्हायला वेळ लागत नाही.
मंगळवारचे उपाय
केस आणि नखे कापू नका
मंगळवारी डोक्यावरचे केस आणि नखे चुकूनही कापू नयेत, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. तसेच दाढीही करू नये. असे करणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की जे लोकं हे नियम पाळत नाहीत, त्यांना त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता आणि पैशाची हानी सहन करावी लागते.
काळे कपडे घालणे टाळा
मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे घालणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने जीवनात दुःखाचा संचार होतो आणि पैशाचे स्रोत कमी होतात असे म्हणतात. मंगळवारी केशरी आणि लाल रंगाचे कपडे घालावेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यामुळे मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो.
कर्ज देऊ नका किंवा कर्ज घेऊ नका
मंगळवारी कर्जाचे व्यवहार टाळावेत, असे धार्मिक अभ्यासक सांगतात. असे केल्याने धनाची हानी होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, ज्यामुळे कुटुंब हळूहळू गरीब होऊ लागते.
सौंदर्य प्रसाधने खरेदी करणे अशुभ
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नये. असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होते आणि घरगुती कलह वाढू लागतो, ज्यामुळे कुटुंब तुटायला वेळ लागत नाही.
मांस आणि मद्यापासून दूर रहा
मंगळवार हा सनातन धर्मात सात्विक दिवस मानला गेला आहे. त्यामुळे या दिवशी मांसाहार आणि मद्यसेवनापासून पूर्णपणे दूर राहावे. जर तुम्ही असे केले नाही तर भगवान बजरंग बली तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमचे चालू असलेले सर्व काम बिघडू लागते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)