Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला दोन शुभ योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी लगबग सुरु झाली आहे. असं असताना यंदाची गणेश चतुर्थी खास असणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. यंदा गणेश चतुर्थी खास असणार आहे. पंचांगानुसार दरवर्षी गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. या तिथीला विनायकी चतुर्थी असं संबोधलं जातं. या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023रोजी आहे. या दिवसापासून गणेशोत्सव सुरु होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जाईल. या कालावधीत संकटमोचक गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली तर सर्व संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. यंदाची गणेश चतुर्थी खास असणार असून दोन योगामुळे महत्त्व वाढलं आहे.
गणेश चतुर्थीला दोन शुभ योग
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. या दिवशी वैधृति योग जुळून आला आहे. दुसरं नक्षत्रांचा एक वेगळात मेळ दिसून येणार आहे. दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र असेल. त्यानंतर विशाखा नक्षत्र सुरु होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या योगात केलेल्या पूजेचं दुप्पट फळ मिळेल.
गणेश चतुर्थी तिथी मुहूर्त
पंचांगानुसार, 18 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला सुरुवात होईल. ही स्थिती 19 सप्टेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला साजरी केली आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली तर जीवन सुख समृदधी येते. तसेच प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं.
राशीनुसार करा गणपतीचा जप
- मेष – ॐ वक्रतुण्डाय हुं।।
- वृषभ – ॐ हीं ग्रीं हीं
- मिथुन- ॐ गं गणपतये नमः
- कर्क- ॐ वक्रतुण्डाय हूं
- सिंह- ॐ सुमंगलाये नमः
- कन्या- ॐ चिंतामण्ये नमः
- तूळ- ॐ वक्रतुण्डाय नमः
- वृश्चिक- ॐ नमो भगवते गजाननाय
- धनु- ॐ गं गणपते
- मकर- ॐ गं नमः
- कुंभ- ॐ गण मुत्कये फट्
- मीन- ॐ अंतरिक्षाय स्वाहा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)