Vastu Shastra: वास्तूशास्त्रात दिवा लावण्याला आहे विशेष महत्व, अशा प्रकारे दुर होतो वास्तूदोष
आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर काही लोकं मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात.
मुंबई, रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे. ज्याचा मुख्य स्त्रोत सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी किंवा सूर्याचा घटक मानला गेला आहे. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की, दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य झाले की पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो. इतकंच नाही तर काही लोकं मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात. चला जाणून घेऊया वास्तूशास्त्राच्या (Vastushastra) दृष्टीने दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत.
नकारात्मकता निघून जाते
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असे मानले जाते. याशिवाय, देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जा संचारते. दिवा लावण्याचा अर्थ अंधःकार दुर करून घर प्रकाशाने भरणे असा आहे.
वास्तुदोषांसाठी
असे मानले जाते की, प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख-समृद्धी येते. देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते, अशी श्रद्धा आहे. खरं तर, आपण देवघरात दिवा लावतो, पण जर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते.
पितळाचा दिवा
देवघरात पूजेसाठी दररोज फक्त पितळेचा दिवा लावावा. हे शुभ मानले जाते. स्टील किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा शुभ मानला जात नाही. अनेकदा लोकं घाईगडबडीत पितळेऐवजी मातीचा किंवा इतर धातूचा दिवा वापरतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)