शिवलिंगावर पाणी अर्पण करण्यासाठीचा शुभकाळ कोणता? कधी करु नये जलअर्पण?
शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी शास्त्रांमध्ये विशिष्ट नियम सांगितले आहेत. या संदर्भात शिवलिंगावर पाणी कधी अर्पण करू नये आणि त्याशी संबंधित विशेष नियम काय आहेत हे समजून घेऊया.
ShivLing Pooja Vidhi : आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक देवतेशी संबंधित विशेष प्रकारची पूजा उपासना करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शंकराची उपासना करण्याचा प्रिय दिवस मानला जातो. प्रत्येक राज्यात आणि भागात देवांची पूजा त्या लोकांच्या श्रद्धेनुसार केली जाते. तसेच सनातन धर्मात भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व प्रकारचे इच्छित फळ मिळते, असे मानले जाते. त्यात असेही म्हटले जाते की, केवळ एक तांब्या पाण्याने शंकराच्या पिंडीवर अभिषेक घातल्यास भगवान शिव प्रसन्न होतात. म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. भगवान शिवाला जल अर्पण करण्यासाठी शास्त्रांमध्ये विशिष्ट नियम देखील सांगितले आहेत. शिवलिंगाला जल अर्पण करताना काही विशेष नियम पाळले पाहिजेत. या संदर्भात भगवान शंकराला पाणी कधी अर्पण करू नये आणि त्यासंबंधीचे विशिष्ट नियम काय आहेत हे समजून घेऊया.
शिवलिंगावर पाणी कधी अर्पण करू नये?
शिवपुराणानुसार सूर्यास्तावेळी किंवा सूर्यास्तानंतरच्या वेळेस शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी योग्य मानले जात नाही. धार्मिकमान्यतेनुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी विषासारखे मानले जाते. तसेच एकदा शिवलिंगाचा भव्य शृंगार झाल्यावर त्यावर पाणी अर्पण करू नये. असे मानले जाते की यामुळे भगवान शंकर नाराज होऊ शकतात.
तसेच तुम्ही शंकराच्या पिंडीवर दुपारच्या वेळेस पाणी अर्पण करू नये, कारण धार्मिक ग्रंथांमध्ये शंकराच्या पिडीवर पाणी वाहने योग्य मानले जात नाही. भगवान सूर्याचे संपूर्ण तेज शिवलिंगात आहे, असा उल्लेख शाश्वत शास्त्रात आहे. त्यामुळे शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी सूर्याची साक्ष मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर शंकराच्या पिंडीवर अर्पण केलेले पाणी सूर्यदेवाची साक्ष मानले जात नाही. अशा वेळी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने काहीच फायदा होत नाही.
जलअर्पण करण्याचा सर्वात शुभ काळ कोणता?
शास्त्रांनुसार सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी ब्रह्म मुहूर्ताचा काळ सर्वात शुभ असतो. या काळात शिवलिंगाला जल अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते आणि भगवान शंकराची विशेष कृपा देखील प्राप्त होते.
जलअर्पण करण्यासाठी हे 3 धातू सर्वात शुभ
शिवलिंगाच्या पुराणानुसार शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी सोने, चांदी आणि तांब्याचे भांडे सर्वात शुभ मानले जातात. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही धातूपासून बनवलेल्या भांड्यांनी शिवलिंगावर जल अर्पण करणे शुभ मानले जात नाही.