2023 चा विश्वचषक भारतातच, पण हे दिग्गज खेळाडू संघात नसणार?
या विश्वचषकात भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे काही खेळाडू पुढच्या विश्वचषकात न दिसण्याची शक्यता आहे. कारण, या खेळाडूंचं सध्याचं वय आणि युवा खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना संधी न मिळण्याचीच दाट शक्यता आहे.
मुंबई : महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच या विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवासही इथेच संपला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. या विश्वचषकात भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे काही खेळाडू पुढच्या विश्वचषकात न दिसण्याची शक्यता आहे. कारण, या खेळाडूंचं सध्याचं वय आणि युवा खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना संधी न मिळण्याचीच दाट शक्यता आहे.
या विश्वचषकात भारतीय संघामध्ये लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मयांक अग्रवाल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाचं योगदान देत भारताला सेमीफायनलपर्यंत नेलं. 2023 च्या विश्वचषकाचे सर्व सामने भारतात होणार आहेत. मायदेशात विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला पुन्हा नव्याने बांधणी करावी लागणार आहे.
महेंद्रसिंह धोनी
भारतीय संघाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये नवी ओळख मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुढच्या विश्वचषकात दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. धोनीच्या फिटनेसवर कुणालाही शंका नसली तरी त्याचा फॉर्म पाहता 2023 च्या विश्वचषकात तो न खेळण्याचाच अंदाज आहे. धोनीने पहिल्यांदा 2007 च्या विश्वचषकात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर 2011 ला भारताला विजेतेपद मिळवून दिलं, 2013 ला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि कसोटी क्रिकेटमध्येही नंबर वन होण्याचा मान मिळवला. पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मानही कर्णधार म्हणून धोनीलाच जातो.
दिनेश कार्तिक
विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचाही हा अखेरचा विश्वचषक असण्याची शक्यता आहे. भारतीय संघात धोनी आणि रिषभ पंत हे दोन विकेटकीपर आहेतच, त्यामुळे फलंदाजीसाठीही योग्य स्थान मिळवण्यात दिनेश कार्तिकला अपयश आलंय. 15 वर्षांनी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाल्यानंतरही दिनेश कार्तिकला संयमी खेळी करता आली नाही. भारतीय संघ दबावात असताना तो 25 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. या विश्वचषकात त्याची सर्वोच्च धावसंख्या 8 होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला हिरो होण्याची संधी होती. दिनेश कार्तिकने धोनीच्या तीन महिने अगोदर म्हणजे सप्टेंबर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2007 च्या विश्वचषकात धोनीला बॅकअप म्हणून निवड झाली, पण भारतीय संघ लवकरच बाहेर पडल्यामुळे संधी मिळाली नाही. 2011 आणि 2015 च्या विश्वचषकासाठी निवड झाली नाही.
रवींद्र जाडेजा
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवणारा रवींद्र जाडेजा सध्या 30 वर्षांचा आहे. संधी मिळेल तेव्हा जाडेजाने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलंय. क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये तो कुठेही कमी पडत नाही. पण भारतीय संघात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या गोलंदाजांनी त्यांचं स्थान बळकट केल्यामुळे रवींद्र जाडेजाला अनेकदा वगळावं लागलं. पण जाडेजाने पुढची काही वर्ष असंच प्रदर्शन केल्यास त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी आहे. अविस्मरणीय खेळीनतंर जाडेजाने केलेलं ट्वीटही चांगलंच चर्चेत राहिलं. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेन, असं तो म्हणाला.
शिखर धवन
या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच दुखापतीमुळे 33 वर्षीय शिखर धवनला माघार घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीनंतर त्याला पुढच्या सामन्यात खेळता आलं नाही. फिटनेसमुळे सतत आत-बाहेर आणि कामगिरीतील असातत्य यामुळे शिखर धवनलाही पुढच्या विश्वचषकाला मुकावं लागू शकतं. कारण, सलामीवीर फलंदाज म्हणून मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ यांच्यासारखी नवी पिढी सज्ज झाली आहे.
लोकेश राहुल
सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलच्या कामगिरीवरही या विश्वचषकात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. एका सामन्यात त्याने शतकी खेळी केली, पण त्याच्या अपयशाचा आलेख चढताच होता. अनेकदा संधी देऊनही लोकेश राहुल स्वतःला सिद्ध करु शकला नाही. चौथ्या क्रमांकासाठी रिषभ पंत हा पर्याय भारतीय संघाकडे तयार आहे, तर सलामीसाठीही भारतीय संघ आता नव्या पर्यायाचा वापर केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकेश राहुलचं संघातील स्थान अडचणीत आलंय.
2023 चा विश्वचषक भारतात
आगामी विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळालंय. विश्वचषकाचे सर्व सामने भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 1987, 1996, आणि 2011 च्या विश्वचषकातील काही सामनेच भारतात झाले होते. 9 फेब्रुवारी ते 26 मार्च 2023 या काळात ही मालिका खेळवली जाईल.