भारत हा जगातला सर्वोकृष्ट संघ, अफगाणिस्तानच्या कर्णधाराकडून कौतुक
विश्वचषक सामन्यातील अफगानिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वचषकातील सलग चौथा विजय नोंदवला. यानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघाचे कौतुक होत आहे.
लंडन : भारताने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकातील सलग चौथा विजय नोंदवला. मात्र, या विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजावे लागले. शेवटच्या षटकामध्ये भारताच्या मोहम्मद शमीने विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक घेतल्याने भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि तमाम भारतीयांचा जीव भांड्यात पडला. यानंतर देशभरातून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. हे कौतुक आता देशापुरते मर्यादित राहिले नसून खुद्द अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नईब यानेही पराभवानंतर भारतीय संघाची प्रशंसा केली. भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक असल्याचे मत नईबने व्यक्त केले.
गुलबदीन नईबने अफगाणिस्तानसोबत झालेल्या सामन्यात भारताच्या विजयाचे श्रेय भारतीय संघाच्या सांघिक खेळीला दिले. तो म्हणाला, “अफगाणिस्तानविरुद्धच्या भारतीय विजयाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. त्यांनी खूपच चांगली गोलंदाजी केली. बुमराह आणि शमी यांनी प्रभावी गोलंदाजी केली. धोनी आणि जाधवलाही या विजयाचे श्रेय जाते. भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे.”
शनिवारी (22 जून) अत्यंत थरारक सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात करुन आपला विजयरथ कायम राखला. मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्ताननेही भारताला चांगली टक्कर देत शेवटच्या षटकापर्यंत झुंझ दिली. मात्र, भारतीय खेळाडूंच्या झंझावतासमोर ही झुंज अपुरी ठरली आणि भारताने विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम भारताला 224 धावांवरच रोखले. त्यानंतर मैदानात उतरुन शानदार फलंदाजी केली आणि काही काळ की होईना भारताच्या संघाला पराभवाच्या छायेत नेले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत अखेरच्या षटकात विजय खेचून आणला. या थरारक सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने 4 फलंदाजांना तंबूत पाठवताना शेवटच्या निर्णायक षटकात हॅट्रिक घेतली. जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी 2 खेळाडू बाद केले.
भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज लावला जात असला, तरी अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजी चालली नाही. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट 67 धावांवर बाद झाला आणि मोठी धावसंख्या उभी राहण्याची आशा मावळली. लोकेश राहुल 30, विजय शंकर 29, एमएस धोनी 28 आणि केदार जाधवने 52 धावांचं योगदान दिलं.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला संघर्ष करायला भाग पाडलं. मुजीब उर रेहमानने 10 षटकांमध्ये केवळ 26 धावा देत एका फलंदाजाला माघारी धाडलं. गुलबदीन नायब आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर राशीद खान, रहमत शाह आणि अफ्ताब आलम यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.
भारताच्या अनेक खेळाडूंनी जागतिक क्रमवारीत आपले स्थान निश्चित केले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह अशा अनेक खेळाडूंचा दबदबा जागतिक क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे याचा परिणाम एकूणच भारतीय संघाच्या सांघिक कामगिरीवरही होत आहे.