Team India : टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनात होणार भव्य सत्कार; ‘या’ चार खेळाडूंचा विशेष सन्मान
टीम इंडियाचे खेळाडू टी-20चा वर्ल्ड कप जिंकून अखेर भारतात आले आहेत. तब्बल 15 तासांचा प्रवास करून टीम इंडियाचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू नवी दिल्ली विमानतळावर येताच एकच जल्लोष करण्यात आला. आज हे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. त्यानंतर त्यांची मुंबईत भव्य व्हिक्ट्री परेड होणार आहे. तर उद्या मुंबईकर खेळाडूंचा विधान भवनात सत्कार करण्यात येणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत येणार आहे. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघणार आहे. त्यामुळे आपल्या जगज्जेत्या खेळांडूचा भव्य सत्कार करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. याशिवाय उद्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनातही सत्कार होणार आहे. यावेळी मुंबईकर खेळाडूंचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. टीम इंडीयातील 4 खेळाडू मुंबईकर आहेत. हे चारही जण महाराष्ट्रातील आहेत. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे. विधीमंडळ आवारात टीम इंडियातील खेळाडू येणार आहेत. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या जगज्जेत्या खेळाडूंचा सत्कार केल्यावर इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे चार खेळाडू उद्या विधान भवनात येतील. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या खेळाडूंनी देशाची मान उंचावली आहे. त्यामुळे या खेळाडूंचा आम्ही योग्य तो सन्मान करणार आहोत, असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत भव्य व्हिक्ट्री परेड
टीम इंडियाचे खेळाडू आज मुंबईत येतील. त्यानंतर त्यांची मुंबईत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी खास गुजरातमधून बस मागवण्यात आली आहे. या बसवर वर्ल्ड कप विजयी संघांचे स्टीकर लावण्यात आले आहेत.
भव्य स्वागत
दरम्यान, टीम इंडियाचा संघ बारबाडोस ते नवी दिल्ली हा 15 तासांचा प्रवास करून मायदेशी आली आहे. मायदेशी येताच नवी दिल्ली विमानतळावर टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात आलं. हॉटेल आयटीसी मौर्यापर्यंत टीम इंडियाचा संघ दिमाखात आला. टीम इंडियाच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीकर रस्त्यावर आले होते. त्यामुळे वातावरणात एकच जल्लोष निर्माण झाला .