पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर बीसीसीआयच्या निशाण्यावर?
बीसीसीआयमधील एक गट संजय बांगर यांच्यावर नाराज आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी चांगलं काम केलं आहे. पण संजय बांगर यांची कोचिंग स्टाफमधून सुट्टी केली जाऊ शकते.
लंडन : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह इतर कोचिंग स्टाफचा करार आणखी 45 दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. मात्र सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्याबाबत अनिश्चितता आहे. कारण, बीसीसीआयमधील एक गट संजय बांगर यांच्यावर नाराज आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी चांगलं काम केलं आहे. पण संजय बांगर यांची कोचिंग स्टाफमधून सुट्टी केली जाऊ शकते. भारतीय संघ अजून चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शोधू न शकणं हे संजय बांगर यांचं अपयश मानलं जातं.
बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने IANS शी बोलताना सांगितलं, “चौथा क्रमांक नेहमीच चिंतेचा विषय राहिलाय. आमचं खेळाडूंना पूर्ण समर्थन आहे, कारण ते फक्त एकाच सामन्यात (न्यूझीलंडविरुद्ध) चांगला खेळ दाखवू शकले नाही. पण स्टाफची प्रक्रिया आणि निर्णयांची चौकशी केली जाईल. यानंतरच त्यांच्या भविष्याचा निर्णय होईल.” विजय शंकरला दुखापतीमुळे बाहेर करण्यात आलं. पण त्यापूर्वी संजय बांगर यांनी विजय शंकर फिट असल्याचा दावा केला होता.
“दुखापतीमुळे विजय शंकरला मालिकेला मुकावं लागलं, तर त्यापूर्वी संजय बांगर यांनी तो फिट असण्याचा दावा करणं यामुळे असमंजस परिस्थिती निर्माण झालेली दिसते. वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह संघ व्यवस्थापनामध्ये निर्णयांच्या बाबतीत भ्रम होता आणि क्रिकेट सल्लागार समितीकडेही दुर्लक्ष करण्यात आलं, जी लाजिरवाणी गोष्ट आहे,” असं या अधिकाऱ्याने सांगितलं.
विश्वचषकादरम्यान फलंदाजांना काही अडचण असेल, तर ते माजी खेळाडूंकडून सल्ला घेत होते, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. शिवाय टीम मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांच्या वर्तवणुकीबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मित्रांसाठी तिकिटं मिळवणं आणि आपली कॅप सुरक्षित ठेवणं हे एकमेव त्यांचं ध्येय असल्याचं दिसत होतं. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सुब्रमण्यम यांच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :