पृथ्वी शॉची ड्रामेबाजी अजिंक्य रहाणेनी अशी पकडली, मैदानातच झापलं आणि सांगितलं…
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कसोटी संघानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याच्या कर्णधारपदाला हवा तितका न्याय मिळाला नाही. मात्र असं असलं तरी कर्णधारपद भूषविताना किती बारीक लक्ष असायचं, हे आर. श्रीधर यांच्या पुस्तकातून अधोरेखित होतं.

मुंबई- विराट कोहलीकडे कसोटी कर्णधारपदाची धुरा असताना अनेकदा त्याच्या गैरहजेरीत ही भूमिका अजिंक्य रहाणे सक्षमपणे पार पाडायचा. अजिंक्य रहाणे याने कर्णधारपद सहा सामन्यात भूषविलं आहे. रहाणेनं 2017 ते 2021 दरम्यान भारताचं कर्णधारपद सांभाळलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या सहा सामन्यापैकी 4 सामन्यात विजय, तर 2 अनिर्णित ठरले आहेत. रहाणेचं कर्णधारपद भूषविताना विजयाचं गणित 66.6 टक्के इतकं राहिलं आहे. पण असं असलं तरी रहाणेला कर्णधार म्हणून तितका सन्मान मिळाला नाही. नुकतंच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर याने आपल्या ‘कोचिंग बियाँड’ या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. या पुस्तकातील काही किस्से वाचल्यानंतर तुमचा अजिंक्य रहाणेबाबतचा असलेला सन्मान आणखी वाढेल.इतकंच काय तर पृथ्वी शॉची ड्रामेबाजी मैदानातच पकडली चांगलच झापल्याचं उदाहरण देखील देण्यात आलं आहे.
आर. श्रीधरने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, “अजिंक्यने भारतासाठी चांगला रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटीत नेतृत्व केलं आणि त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला. यापैकी दोन सामने त्या देशात खेळले गेले.कायमस्वरुपी कर्णधारपद न भूषविणाऱ्या रहाणेचं हे कतृत्व आहे. म्हणजेच त्याला खेळाबाबत चांगलं माहिती आहे.” आर. श्रीधर यांनी पुढे पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील एका घटनेचाही उल्लेख केला आहे.
“रहाणे कोणतीच चूक करत नाही. एक अशी घटना घडली की पृथ्वी शॉ सिडनीच्या ड्रममोयनेमध्ये सराव सामना खेळत होता. तिथे शॉर्ट लेगला त्याला क्षेत्ररक्षणासाठी उभं केलं होतं. फलंदाजाने स्वीप शॉर्ट मारला. तो शॉट पृथ्वीला लागला. तेव्हा तो लंगडत लंगडत ड्रेसिंग रुमच्या दिशेने चालू लागला. पण रहाणेला हा चेंडू नेमका कुठे लागला हे माहिती होतं.”, असं त्यांनी आपल्या पुस्तकात लिहीलं आहे.त्यानंतर रहाणे त्याच्या जवळ गेला आणि स्पष्टपणे म्हणाला.
“एक पाऊल पण ड्रेसिंग रुमच्या दिशेने टाकू नको. कोणीही तुझ्या जागेवर क्षेत्ररक्षणासाठी येणार नाही. मला माहिती आहे चेंडू नेमका कुठे लागला आहे. त्याने शॉर्ट लेगला पुन्हा जाण्यास सांगितलं. त्याचबरोबर इतर खेळाडूंना अशा पद्धतीने स्पष्टच सांगितलं की, ड्रामेबाजी चालणार नाही.”, असंही आर. श्रीधर यांनी पुढे सांगितलं.
अजिंक्य रहाणे क्रिकेट कारकिर्द
अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत एकूण 82 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात कर्णधारपद भूषवलं. फलंदाज म्हणून 12 शतकं आणि 25 अर्धशतकं झळकावली आहेत. अजिंक्य रहाणेचं 188 ही धावसंख्या सर्वोत्तम आहे. कसोटी सामन्यात आतापर्यंत 4931 धावा केल्या आहेत.