Racial Abuse | …म्हणून पंचांनी सांगूनही आम्ही मैदान सोडलं नाही; कप्तान रहाणेचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतात परतला आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका वेगवेगळ्या गोष्टींनी गाजली.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतात परतला आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका वेगवेगळ्या गोष्टींनी गाजली. तसेच या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करुन या मालिकेला गालबोट लावण्याचा प्रयत्नही केला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली होती. या घटनेबाबत भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने नुकताच मोठा खुलासा केला आहे. सिराजने सांगितले की प्रेक्षकांकडून होणाऱ्या वर्णद्वेषी टीकेबाबत आम्ही पंचांकडे तक्रार केली होती. तेव्हा पंचांनी आम्हाला मैदान सोडून जाण्यास सांगितले होते. दरम्यान, भारतीय संघाने पंचांच्या सल्ल्यानंतरही मैदान का सोडले नाही, याबाबत मोठा खुलासा केला आहे. (Ajinkya Rahane Reveals He Declined to Leave Field After Racial Abuse To Mohammad Siraj)
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांवर वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर त्यांनी आधी कर्णधार अजिंक्य रहाणे याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर रहाणेने पंचांकडे तक्रार केली. तरीदेखील त्यावर काही हालचाल झाली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा सिराज-बुमराह यांच्यावर वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर रहाणे केवळ पंचांकडे तक्रार करुन शांत बसला नाही. त्याने सामना रोखला. त्यामुळे पंचांना, सामनाधिकाऱ्यांना ठोस पावलं उचलावी लागली. अजिंक्य रहाणेच्या ठाम भूमिकेनंतर मैदानातील सुरक्षा रक्षकांनी संबंधित प्रेक्षकांना मैदान सोडून जाण्यास भाग पाडले. त्यानंतरच रहाणेने सामना सुरु केला. रहाणेच्या या कृतीचं खूप कौतुक झालं. तसेच संघातील नवोदित खेळाडूंचा पाठिशी ठाम उभा राहिल्यामुळे रहाणेने सहकाऱ्यांची मनं जिंकली. दरम्यान यावेळी पंचांनी भारतीय कर्णधार आणि खेळाडूंना मैदान सोडून जाण्यास सांगितले होते. परंतु भारतीय खेळाडूंनी तसं केलं नाही.
या घटनेबाबत बोलताना रहाणे म्हणाला की, सिडनीत सिराज आणि इतर खेळाडूंसोबत जे काही झालं होतं, ते खूपच क्लेशदायक होतं. त्यावेळी आमच्या तक्रारीनंतर पंचांनी आम्हाला मैदान सोडून जाण्यास सांगितले होते. परंतु मी त्यांना सांगितले की, आम्ही असं करणार नाही. आम्ही इथे क्रिकेट खेळायला आलो आहोत. परंतु त्यासाठी आम्ही आमच्या खेळाडूंचा अपमान सहन करणार नाही. आम्ही आमच्या खेळाडूंचा सन्मान करतो. तुम्ही आम्हाला मैदानातून बाहेर जाण्यास सांगण्याऐवजी आमच्या खेळाडूंवर अभद्र भाषेत टीका करणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगा. तसं केल्यास आम्हीही इथेच आहोत, मग सामना सुरु करता येईल. आम्ही आमच्या खेळाडूंचा सन्मान करतो आणि मी माझ्या खेळाडूंसाठी सदैव उपलब्ध आहे.
विजयीवीर मोहम्मद सिराज विमानतळावरुन थेट कब्रस्तानात
ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) शिलेदार भारतात परतले आहेत. देशातील विविध शहरांमधील विमानतळावर तसेच त्यांच्या राहत्या घरी या खेळाडूंचे शानदार स्वागत करण्यात आले. गोलंदाज मोहम्मद सिराज हैदराबाद विमानतळावर पोहचला. सिराज विमानतळावरुन घरी न जाता परस्पर आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कब्रस्तानात (दफनभूमी) पोहचला होता. त्यावेळी तो भावूक झाला होता.
सिराज सकाळी 9 च्या दरम्यान हैदराबादमधील कब्रस्तानात पोहचला. सिराजने त्याच्या वडिलांच्या कबरीवर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याने नमाज अदा केली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना सिराज भावूक झाला होता. त्याचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचं 20 नोव्हेंबरला निधन झालं. त्यांना फुप्फुसाचा आजार होता. भारतीय संघ कोरोना नियमांनुसार बायोबबलमध्ये होता. बीसीसीआयने सिराजला भारतात जाण्यासाठी क्वारंटाईन नियमांमधून सवलत दिली होती. पण सिराजने अशा भावनिक प्रसंगी राष्ट्राला प्राधान्य दिलं. सिराजच्या या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं.
हेही वाचा
Racial Abuse | पंचांनी आम्हाला मैदान सोडून जाण्यास सांगितलेलं; मोहम्मद सिराजचा मोठा खुलासा
Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा
क्रिकेट भेदभाव करत नाही, भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश
AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
(Ajinkya Rahane Reveals He Declined to Leave Field After Racial Abuse To Mohammad Siraj)