Robin Uthappa : माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण ?
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया.
भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. प्रॉव्हिडंट फंडमध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, उथप्पा याने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 23 लाख रुपये कापले पण त्याने ते पैसे प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केलेच नाहीत. याच कारणामुळे त्याला अटक करण्यासाठी 4 डिसेंबर रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले. मात्र, उथप्पा याला संपूर्ण रक्कम भरण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर उथप्पा याला तुरुंगात जावे लागू शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
खरंतर, रॉबिन उथप्पा हाँ बंगळुरूमध्ये कपड्यांची एक कंपनी चालवतो. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत त्याची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. पीएफ कमिश्नरनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीला 23 लाख 36 हजार 602 रुपये आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करायचे होते. मात्र त्यांच्या पगारातून पैसे कापूनही कंपनीने ते पैसे जमा केले नाही, त्यामुळे उथप्पा याच्याविरोधात पूर्व बंगळुरूमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. मात्र उथप्प याने त्याचा जो पत्ता दिला आहे, सध्या तो तिथे रहात नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
सध्या उथप्पा हा दुबईमध्ये आहे. पोलिसांनी पीएफ ऑफिसलाही याबाबत माहिती दिली असून आता ही बाब त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे नमूद केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या उथप्पाविरोधात कोणतीही अधिकृत एफआयआर किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्याला पीएफ ऑफीसमधून केवळ अटक वॉरंटचे आदेश मिळाले होते. यापूर्वी उथप्पा हा बंगळुरूच्या व्हीलर रोडवरील पुलकेशीनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.
रॉबिन उथप्पाचं करिअर
रॉबिन उथप्पाने भारताद्वारे 2006 मध्ये वनडे तर 2007 साली टी20 मधून पदार्पण केलं. 2015 साली त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने 46 वनडेमध्ये 25.94 च्या रेटने 934 धावा केल्यात त्यात 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या. 2007 च्या T20 विश्वचषक संघाचाही तो एक भाग होता. IPL मध्ये त्याने एकूण 205 सामने खेळले आणि 27.51 च्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 4952 धावा केल्या. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा भाग होता.