Ind vs Aus :ऑस्ट्रेलियाचा मॅचविनर स्मिथ आश्विनसमोर नतमस्तक, हा रेकॉर्ड पाहून स्वत:च लाजेल
जगातील नंबर 1 आणि 2 फलंदाज असलेल्या संघाचं स्पिनर्ससमोर काहीच चाललं नाही. स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ याला तर आर. आश्विनने गिऱ्हाईकच बनवलं आहे. दोन्ही डावात बाद करत एक विक्रम आश्विनने आपल्या नावावर केला आहे.
मुंबई : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्याही कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय स्पिनर्ससमोर नांगी टाकली. नागपूर कसोटीमध्ये झालेल्या पराभवानंतर कांगारू मुसंडी मारतील असं सर्वांना वाटत होतं. मात्र, तसं काहीच पाहायला मिळालं नाही. दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 6 विकेट्सने पराभव झाला आहे. जगातील नंबर 1 आणि 2 फलंदाज असलेल्या संघाचं स्पिनर्ससमोर काहीच चाललं नाही. स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ याला तर आर. आश्विनने गिऱ्हाईकच बनवलं आहे.
दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथची विकेट घेत अश्विनने जगातील नंबर 2 कसोटी फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. आर. आश्विनने आतापर्यंत स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये 8 वेळा बाद केलं आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूला 7 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणारा पाकिस्तानी फिरकी गोलंदाज यासिर शाहचा विक्रम अश्विनने मोडला. रवींद्र जडेजाने स्मिथला 5 वेळा आपल्या जाळ्यात अडकलं आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथनेही स्मिथला 5 वेळा बाद केलं.
दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात स्मिथला साधं खातंही उघडता आलं नव्हतं. आश्विनने त्याला दुसऱ्याच चेंडूवर बाद करत तंबूचा मार्ग दाखवला होता. दुसऱ्या डावातही अवघ्या 9 धावांवर असताना आश्विनने स्मिथला माघारी पाठवत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. दिल्लीच्या कसोटीमध्ये 25 मिनिटं स्मिथला खेळपट्टीवर तग धरता आला.
कसोटी सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथने 2020 पासून आतापर्यंत आश्विनच्या 149 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 73 धावा केल्या आणि 5 वेळा आपली विकेट बहाल केली आहे. आकडेवारीनुसार स्मिथला अजुनही आश्विनचं कोडं सोडवता आलेलं नाही.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश: ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.