आई ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर, अंडर 19 आशिया चषक गाजवणाऱ्या अथर्व अंकोलेकरचं अंधेरीत जंगी स्वागत
अंडर नाईन्टीन आशिया चषकाच्या अंतिम फेरीत अथर्व अंकोलेकरने आठ षटकांत 28 धावांच्या मोबदल्यात पाच गडी टिपले आणि तो अंतिम सामन्याचा हिरो ठरला.
मुंबई : भारताला अंडर नाईन्टीनचा आशिया चषक पटकावून देणारा मराठमोळा क्रिकेटपटू अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar Asia Cup) याचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या विजयी मिरवणुकीत अथर्वसोबतच त्याच्या आईनेही ठेका धरला. ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर असलेल्या वैदेही अंकोलेकर यांचा आनंद (Atharva Ankolekar Asia Cup) गगनात मावेनासा झाला होता.
बांगलादेशविरोधात झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पाच धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये असलेल्या आर प्रेमदास स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्याचा हिरो ठरला अठरा वर्षांचा अथर्व अंकोलेकर.
मायदेशी परतल्यानंतर अथर्वचं अंधेरी पूर्वेकडील प्रकाशवाडीत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. मित्रमंडळींनी अथर्वची थाटामाटात विजयी मिरवणूक काढली. खांद्यावर बसवून त्याला नाचवलंही. एकीकडे अथर्व पाठिराख्यांना झोकात स्वाक्षरी ठोकून देत होता, तर दुसरीकडे ताल धरलेल्या त्याच्या आईचे डोळे अभिमानाने पाणावले होते.
अथर्वच्या यशाचं श्रेय वैदेही अंकोलेकर यांना द्यावंच लागेल. पतीच्या निधनानंतर त्यांनी ‘बेस्ट’मध्ये कंडक्टर म्हणून नोकरी केली आणि आपल्या लेकाला वाढवलं. त्यामुळे मुलाने मिळवलेल्या यशाचा सर्वाधिक आनंद वैदेही अंकोलेकरांना होणं स्वाभाविक होतं. अथर्वच्या स्वागतासाठी झालेल्या जल्लोषात त्या उत्साहानं सहभागी झाल्या होत्या.
अंडर नाईन्टीन आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशसमोर 106 धावांचं आव्हान उभं केलं होतं. त्याचा पाठलाग करताना बांगलादेशी संघ 33 षटकात 101 धावांवर गारद झाला. 18 वर्षांच्या डावखुरा फिरकीपटू असलेल्या अथर्वने आठ षटकांत 28 धावांच्या मोबदल्यात पाच गडी टिपले आणि तो अंतिम सामन्याचा हिरो ठरला.
अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ दि मॅच’ अर्थात सामनावीराचा किताब त्याने पटकावलाच. पण संपूर्ण टूर्नामेंटमध्येच अथर्वने चमकदार कामगिरी केली होती.
Defending Champions India U19 hold their nerve and seal a thrilling 5 run win over Bangladesh in U19 Asia Cup final. We are proud of you boys! ✌✌ pic.twitter.com/Lo6j32Cfte
— BCCI (@BCCI) September 14, 2019
अथर्व दहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र लहानपणीच त्यांनी अथर्वमध्ये क्रिकेट खेळण्याची आवड रुजवली होती. पतीच्या पश्चात वैदेही यांनी त्यांची नोकरी तर स्वीकारलीच, पण घरखर्च चालवतानाच नवऱ्याने लेकासाठी पाहिलेलं स्वप्नही त्यांनी जोपासलं.
अथर्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासोबतच कॉमर्सचं शिक्षण घेत आहे. 19 वर्षांखालील संघात आंतराराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारा हा पठ्ठ्या उद्या भारतीय संघातही वर्णी लावेल, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.