Aus vs Ind 3rd Test | सिडनी कसोटीत टीम इंडियाची मदार दोन मुंबईकरांवर
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहितला स्थान मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यात 7 जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत शानदार पुनरागमन केलं. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास वाढलेला आहे. त्यात रोहित शर्माला तिसऱ्या कसोटीत स्थान निश्चित मानलं जात आहे. यामुळे टीम इंडिया आणखी मजबूत झाली आहे. तसेच दुसऱ्या कसोटीत रहाणेने कर्णधार आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडली. तिसऱ्या कसोटीत रहाणे आणि रोहित या दोन मुंबईकर खेळाडूंवर टीम इंडियाची जबाबदारी असणार आहे. मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना निर्णायक असणार आहे. 4 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे दोन्ही संघांचा तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाच्या कमी आणि जमेची बाजू पाहणार आहोत. (aus vs ind 3rd test Ajinkya Rahane and Rohit Sharma will lead team India)
रोहित शर्माचं पुनरागमन
रोहित शर्माचं तिसऱ्या कसोटीत टीम इंडियात कमबॅक जवळपास निश्चित मानलं जात आहे. रोहितच्या कमबॅकमुळे टीम इंडियाला अनुभवी खेळाडू मिळणार आहे. संधी मिळाल्यास रोहितवर सलामीची जबाबदारी असणार आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी रोहितवर असणार आहे.
रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी
रोहित ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 31 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. नाबाद 63 ही त्याची ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
रहाणेचं शतक टीम इंडिया ‘अजिंक्य’
अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला. रहाणेची नेतृत्वातील आकडेवारी जबरदस्त आहे. रहाणने आतापर्यंत एकूण 3 कसोटींमध्ये नेतृत्व केलं आहे. या तिनही सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तसेच रहाणेने जेव्हा जेव्हा शतकी खेळी केली, तेव्हा तेव्हा टीम इंडियाचा विजय झाला आहे. रहाणेचं शतक ही टीम इंडियासाठी विजयाचे संकेत असतात. त्यामुळे रहाणेकडून या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या कसोटीसारख्याच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
सर रवींद्र जाडेजा
ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीच्या जागी संधी देण्यात आली. जाडेजाने या दुसऱ्या कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली. जाडेजाने या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात कर्णधार रहाणेसोबत शतकी भागादारी केली. जाडेजाने 57 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच गोंलदाजी करताना पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 3 विकेट्स घेतल्या. जाडेजाने बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. जाडेजाकडून तिसऱ्या कसोटीतही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.
जसप्रीत बुमराह
टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना दुखापतीमुळे या कसोटी मालिकेला मुकावे लागले. अशा परिस्थितीत यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहने यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. बुमराहने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 6 विकेट्स घेतल्या. त्यात दुसऱ्या सामन्यादरम्यान उमेश यादवला दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. यामुळे बुमराहवर गोलंदाजीची मदार असणार आहे. बुमराहवर तिसऱ्या सामन्यात नवख्या गोलंदाजांना मार्गदर्शनासह स्वत:ला चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे.
पॅट कमिन्सपासून सावध
टीम इंडियाच्या फलंदाजांना वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सपासून सावध रहावे लागणार आहे. कमिन्सच्या बोलिंगला डिफेन्स करताना भारतीय फलंदाजांना सावध पवित्रा घ्यायला हवा. कमिन्स या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपासून आक्रमक आणि भेदक गोलंदाजी करतोय. कमिन्सने पहिल्या कसोटीत 7 तर दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
जेम्स पॅटिन्सन संघाबाहेर
ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीआधी मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीमधून बाहेर झाला आहे. पॅटिन्सनला याआधीच्या दोन्ही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
ऑस्ट्रेलियाची तिकडी डोकेदुखी
टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशाने आणि कर्णधार टीम पेन या तिकडीचे आव्हान असणार आहे. या तिकडीने दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला चांगलेच हैराण केलं होतं. यामुळे या तिन्ही खेळाडूंना लवकरात लवकर बाद करण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.
फिल्डिंग आणि बोलिंग
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अनेक चुका केल्या. काही खेळाडूंनी कॅचेस सोडल्या. तसेच गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. मात्र यानंतर दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत धमाकेदार कामगिरी केली. यामुळे या गोलंदाजांकडून तिसऱ्या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
सिडनीवरील हेड टु हेड कामगिरी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.
केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी
खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या :
Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज
AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन
(aus vs ind 3rd test Ajinkya Rahane and Rohit Sharma will lead team India)