राशीद खानच्या 11 विकेट, कसोटीत अफगाणिस्तानचा 224 धावांनी विजय
गेल्या वर्षी कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानला भारताविरुद्ध एकमेव कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानने विजय मिळवला होता.
ढाका, बांगलादेश : कर्णधार राशीद (Rashid Khan Afghanistan) खानच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तानने बांगलादेशवर 224 धावांनी मात केली. यासोबतच अफगाणिस्तानचा (Rashid Khan Afghanistan) हा कसोटी क्रिकेटमधील दुसरा विजय ठरला. गेल्या वर्षी कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानला भारताविरुद्ध एकमेव कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानने विजय मिळवला होता.
राशीद खानने कर्णधाराप्रमाणे खेळ करत विजयाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. अंतिम दिवसाला पावसामुळे केवळ 17 षटकांचा खेळ होऊ शकला. यामुळे पहिल्या सत्रातील खेळात व्यत्यय आला. यानंतर अफगाणिस्तानला विजयासाठी केवळ 18.3 षटके मिळाली. यातच राशीद खानने सर्वोत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या जाहिर खानने त्याच्या पहिल्याच चेंडूत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला माघारी पाठवलं. शाकिब 44 धावा करुन माघारी परतला. चहापानापर्यंत बांगलादेशने केवळ 143 धावाच केल्या होत्या. राशीद खानने सर्वोत्कृष्ट खेळी केली आणि दुसऱ्यांदा पाच विकेट पूर्ण केल्या.
अफगाणिस्तानने पहिल्या डावात 342 धावा केल्या होत्या. यानंतर राशीद खानच्या पहिल्या डावातील पाच विकेट्सच्या बळावर बांगलादेशला केवळ 205 धावांपर्यंतच मजल मारता आली, ज्यामुळे अफगाणिस्तानला 137 धावांची आघाडी मिळाली.
यजमान संघासमोर अफगाणिस्तानने विजयासाठी 398 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण बांगलादेशला केवळ 173 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि 224 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यात कर्णधार राशीद खानने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत मोलाची भूमिका निभावली.
दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज मोहम्मद नबीला त्याच्या संघाने विजयी निरोप दिला. या कसोटीनंतर निवृत्ती घेत असल्याचं नबीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.